
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या 1 जून 2014 पासून परदेशातून देशात किती काळा पैसा आणला याची माहिती ही माहिती अधिकार कायद्याखाली (आरटीओ) देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे. विशेष म्हणजे ही माहिती 15 दिवसांत संबंधित व्यक्तीस द्या असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने पीएमओला दिले होते, पण हे आदेशही पीएमओने धुडकावले आहेत.
काळय़ा पैशासंदर्भात ज्या आरोपींविरुद्ध चौकशी सुरू आहे त्या चौकशीत परदेशातून आणलेल्या काळय़ा पैशाची माहिती उघड केल्याने बाधा येईल. यामुळे माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचा आधार घेत ही माहिती देण्यास पीएमओने नकार दिला. आरटीआय कायद्यांतर्गत ही माहिती एक सतर्क नोकरशहा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनीच पीएमओकडे मागितली होती.
काळय़ा पैशासंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी सरकारची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांच्याही देखरेखीखाली असल्याने परदेशातून आणलेल्या काळय़ा पैशाची माहिती आरटीआयच्या एका कलमानुसार देता येत नाही असे स्पष्टीकरण पीएमओने या संदर्भात केले आहे.
यासंदर्भात संजय चतुर्वेदी यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आरटीआयखाली प्रश्न विचारला होता, परंतु आपला प्रश्न हा ट्रान्सपरन्सी कायद्याच्या कलम 2 (फ) मध्ये येत नाही. हा कायदा ‘माहिती’बाबतचे स्पष्टीकरण देणारा आहे असे पीएमओने म्हटले होते. यानंतर चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने ही माहिती 15 दिवसांत देण्याचे आदेश दिले होते.
मंत्र्यांविरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासही नकार
केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचारासंदर्भात आलेली माहिती आरटीआयखाली देण्यात यावी अशी माहिती संजय चतुर्वेदी यांनी पीएमओकडे दुसऱया एका अर्जाद्वारे मागितली होती, परंतु ही माहितीही देण्यास पीएमओने नकार दिला. अशा प्रकारची माहिती देणे ही वैयक्तिक स्वरूपाची आणि अडथळे निर्माण करणारी होऊ शकते, असे पीएमओने ही माहिती देण्यास नकार देताना म्हटले आहे.
























































