
सामना प्रतिनिधी । मुंबई
धनगरी संस्कृती आणि तिची विशिष्ट असलेली बोलीभाषा यांच्या संवर्धनाची जबाबदारी ओळखून ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या वतीने ‘स्पंदन मल्हारी’च्या तिसऱया पर्वाचे आयोजन यंदा प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे.
दऱयाखोऱयात असह्य जगणं जगून, गुराशेरडांचा सांभाळ करत त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे वागणूक देणारी धनगर जमात म्हणजे एकार्थी प्राणीमित्रच. या जमातीची होत असलेली परवड, देवाधिकांशी असलेले नाते, पेटून उठलेला आरक्षणाचा विषय, सरकारकडून होणारी हेळसांड यासारख्या विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून ऊहापोह रंगणार आहे. पहिल्या दोन्ही पर्वांना समाजबंधू-भगिनींनी दिलेल्या भरभरून प्रेमानंतर यंदाच्या संमेलनात प्रथमच गोवा राज्यातील बांधवांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील समाजएकीची हाक देणारा कार्यक्रम म्हणून या संमेलनाकडे उत्सुकतेने पाहिले जातेय.
संमेलनात सहभागी होण्यासाठी समाजातील कवी-कवयित्रींनी त्वरित नोंदणी करावी आणि समाजाच्या संस्कृती संवर्धनाप्रति समस्त बांधव-भगिनींनी उपस्थिती दाखवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने सुभाष कोळापटे, गुरुनाथ गोरे यांनी केले आहे.






















































