पालिकेतील मनसेच्या कार्यालयाला टाळे; गटनेत्यांच्या बैठकीत मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

फक्त एक नगरसेवक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पालिकेतील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पालिकेच्या मुख्यालयात प्रत्येक पक्षाला संख्याबळानुसार प्रशासनाने पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. सन 2012 मध्ये मनसेला पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले होते. मात्र वर्षभरापूर्वी मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनेचे तत्कालीन सभागृह नेते यशवंत जाधव यांनी कोकण आयुक्तांकडे या सहा सदस्यांसह शिवसेनेच्या 93 सदस्यांच्या गटाची नोंदणी केली. त्याला कोकण आयुक्तांनी मान्यता दिली असून तसे पत्र पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवले आहे. तशी घोषणाही सभागृहात करण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यावरून खूप हंगामा केला होता.

मनसेची अशी अधोगती
2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सन 2017 च्या पालिकेच्या निवडणुकीत मनसेचे फक्त 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी 6 नगरसेवक शिवसेनेत आल्यामुळे मनसेचे संख्याबळ एक झाले आहे.