
योगेश पाटील । हिंगोली
भाजपाकडून सुक्ष्म नियोजनामुळे निवडणुका जिंकल्या जात असल्याचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बुथ रचनेचे बारा वाजल्याचे समोर आले असून अनेक प्रश्नांना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे उत्तरेच नसल्यामुळे भ्रमाचा भोपळा फुटल्याची माहिती बैठकीत सहभागी सुत्रांनी दिली. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी यामुळे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करत ’ही कामे आम्ही करायची का, बाहेरुन माणसे पाठवून काम करुन घेऊ का’ असा उद्वीग्न सवाल केल्याचेही सांगण्यात आले.
भाजपकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची बैठक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. संघशिस्तीनुसार अपेक्षीत पदाधिकारी व कार्यकत्र्यांनाच बैठकीत प्रवेश देण्यात आला. बैठक होत असलेल्या सभागृहाचे सर्व दरवाजे, खिडक्या पुर्णपणे बंद करुन आतला आवाज बाहेर येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. तसेच बैठकीसाठी अपेक्षीत नसलेल्यांनी बाहेर जाण्याची सुचना प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यावरुन पदाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, अॅड. शिवाजी जाधव, गजाननराव घुगे, सुभाष वानखेडे, शिवाजी माने, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, शिरीष बोराळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विधानसभा विस्तारक, लोकसभा विस्तारक बैठकीला उपस्थित होते.
बैठकीमध्ये तालुक्यातील बुथची संख्या किती, वन बुथ 25 युथची रचना पूर्ण झाली का, मतदार यादी पेजप्रमुख नियुक्त केले का, पक्षाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी बुथस्तरीय कार्यकत्र्यांची नियुक्ती, भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यासंदर्भातील प्रश्न प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केले. सेनगाव तालुक्यातील काम समाधानकारक असल्याचे आढळुन आल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर हिंगोली, वसमत, हदगाव, किनवट, माहुर, औंढा, कळमनुरी या तालुक्यामध्ये असमाधानकारक काम असल्याचे पुढे आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 50 टक्केच्यावर बुथमध्ये व्यवस्थित रचनाच झाली नसल्याचेही या आढाव्यामध्ये दिसून आल्याची माहिती देण्यात आली. पक्षीय कामाचा बोजवारा उडाल्यामुळे एक तासाच्या आत ही बैठक आटोपती घेण्यात आली.
दरम्यान, या कामामुळे नाराज झालेल्या दानवे यांनी हिंगोली जिल्ह्यातील व अन्य विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्याचे सांगण्यात आले. बैठकीतील माहिती बाहेर जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली असली तरीही प्रदेशाध्यक्षासमोर भाजपच्या कामाचा उडालेला बोजवारा पुढे आल्याचे एका सुत्रांनी सांगितले.




























































