
राजेंद्र सालकर । कोपरगाव
कोपरगाव शहराच्या उत्तरेकडे कोट्यवधी रुपये खर्चून अर्धवट स्थितीत उभ्या केलेल्या दोन औद्योगिक इमारती आहेत. अपूर्ण कामामुळे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतर झाल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी नेमण्याची तरतुद नसल्याने या दोन्ही इमारती बेवारस आहेत. या इमारतीत सध्या कुणीच राहत नसल्याने इमारतींचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतला असून, अश्लील चाळे करणा-या प्रेमीयुगुलांमुळे रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले आहे. पोलीस व कॉलेज प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रान मोकळे असल्याप्रमाणे दिवसा प्रेमीयुगुले तर रात्री तळीराम वावरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
आयआयटी कॉलेजकरिता सन 2015-16 साली सदरची इमारत बांधण्याचा ठेका नाशिकच्या आर.एच .खान यांना तब्बल 6 कोटी 60 लाखांना देण्यात आला होता. त्यापैकी 5 कोटी 3 लाख 75 हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. वापर करत नसल्याने ही इमारत ओसाड पडली आहे. आयटीआय कॉलेजला येण्या-जाण्यासाठी एकमेव मार्ग असून, आसपास रहिवासी वसाहती आहेत. सध्या ही इमारत भूत बंगल्या सारखी उभे असून इमारती भोवती वेड्या बाभळी, काटेरी झाडे झुडपे वाढल्याने व या इमारतीत कुणीच राहत नसल्याने एकांत मिळवण्यासाठी येथे शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कॉलेज तरुण-तरुणींचा वावर वाढला आहे. इमारतीच्या आतमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लिल चाळे सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
तळीरामांसाठी तर परिसर अड्डाच बनला आहे. हे येथे पडलेल्या दारूच्या, बियरच्या बाटल्यावरून दिसून येते. कोट्यवधी रुपयाची इमारत असूनही येथे शासनाचा एकही माणूस रखवालदारीसाठी नाही. शासनाचा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. इमारतीत वावर असणारे विद्यार्थी हे गुंड प्रवृत्ती असल्याने त्यांच्या कोणी नादी लागत नाही. याबाबत सर्व जण चर्चा करतात मात्र तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही.
सामाजीक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी या इमारतीचा वापर सुरू करावा म्हणून संबंधिताकडे लेखी मागणी करूनही तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या इमारती समोर दोन वेळा सत्यनारायण पूजा घालून शासनाला जाग आलेली नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकासाचे कामे सुरु आहेत असा डोंगोरा पितावला जात आहे मग या इमारतीच्या सुरु होण्यामागे काय गोडबंगाल आहे असा सवाल नागरिक करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचा एकही अधिकारी कधीही या ठिकाणी फिरकत नाही. परिसरातील रहिवाशांना होत असलेल्या त्रासासंदर्भात अधिका-यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. याबाबत नव्याने आलेले सहा. अभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या इमारतीसाठी 5 कोटी 3 लाख 75 हजार रुपये खर्च झाला असला तरी दरवाजे खिडक्या, फरसी, संरक्षण भिंत, पाणी पुरवठा, विद्युतीकरण,अग्निशमन व्यवस्था आदी कामे अपुर्ण आहेत. त्यासाठी 6 कोटी 16 लाख रूपयांचा सुधारीत प्रस्ताव पाठविला आहे. तो मुजुर होताच काम पूर्ण करण्यात येईल.























































