कर्नाटकातील तीन परप्रांतीय नौका पकडल्या, महिन्याभरात सात नौकांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण किनारपट्टींवर परप्रांतीय मच्छिमारांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरु असून सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयाने धडक कारवाईला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या 3 परप्रांतीय नौकांवर मत्स्यविभाग तसेच पोलिसांनी आज शुक्रवारी कारवाई केली आहे. रत्नागिरी जवळच्या समुद्रात मासेमारी करणारी एक नौका मत्स्यविभागाने तर जयगड जवळ समुद्रात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी 2 नौका पकडल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात 7 परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात मत्स्य विभागाला यश आलं आहे.

महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मच्छिमारी करणाऱ्या नौकांचा सध्या सुळसुळाट झालेला आहे. आजही काहीशी अशीच स्थिती होती. रत्नागिरी समुद्राच्या किनाऱ्यालगत काही परप्रांतीय नौका मासेमारी करत असल्याची खबर मत्स्य विभागला मिळाली. त्यानंतर सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांनी या परप्रांतीय नौकांचा समुद्रात पाठलाग केला. त्यातल्या जवळपास 7 ते 8 नौका पळून जाण्यात यशस्वी झाल्या, पळालेल्या नौका जाळे समुद्रात टाकून पळाल्या. मात्र 15 मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर एक नौका पकडण्यात मत्स्य विभागाला यश आलं. कर्नाटकची ही नौका असून जल वैष्णवी असं या ट्रॉलरचं नाव आहे. ही नौका 15 वावच्या आतमध्येच मासेमारी करत होती. या नौकेवर जवळपास एक ते दीड टन मासळी असून 2 लाखांच्या घरात या मासळीची किंमत आहे. या मच्छिचा लिलाव करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया मत्स्यविभागाकडून सुरू होती.

तर दुसरीकडे जयगड समुद्रात गस्त घालत असताना पोलिसांनी 2 परप्रांतीय नौका पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या.