धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर; राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या धावले असुन शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. संपूर्ण धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करुन प्रसिध्दीचा स्टंट करु पाहणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना यानिमीत्ताने जोरदार चपराक बसली आहे.

शासनाने जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. एरंडोल आणि धरणगाव हे दोन तालुके वगळण्यात आले होते. धरणगाव तालुक्यातील फक्त सोनवद या एकाच महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला होता. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत असलेले शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या जळगाव शाखा उद्घाटन कार्यक्रमात राज्यमंत्री पाटील यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना या कामाची आठवण करुन दिली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी धरणगाव तालुक्यात दुष्काळ उपाययोजना राबविण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना सकारात्मक आदेश दिले जातील असे सांगितले. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पाळधी, चांदसर, साळवा, पिंप्री, धरणगाव या महसूल मंडळातही ५० टक्के पेक्षा कमी पिक आणेवारी आल्यामुळे दुष्काळी उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेतही पालकमंत्र्यांनी एरंडोल व धरणगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमीत करणार असुन या दोन्ही तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ लक्षात घेता उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती दिली. शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठ पुराव्याला यश आले आले आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची पोटदुखी वाढल्याने त्यांनी धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्याबाबत प्रसिध्दीचा खटाटोप केला होता. मात्र देवकरांना यानिमीत्ताने मोठी चपराक बसली आहे.