रविंद्र खोमणे ठरला ‘संगीत सम्राट’चा महाविजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ravindra-khomane

विजय जोशी । नांदेड

गेल्या चार वर्षात ‘झी युवा’वर गाजत असलेल्या ‘संगीत सम्राट’ महासंग्रामचा महाविजेता रविंद्र सुखदेव खोमणे ठरला आहे. अंतिम सात स्पर्धकांतून खोमणे याने हे विजेतेपद पटकाविले असून, यापूर्वी ‘गौरव महाराष्ट्राचा’ या ‘कलर्स मराठी’वर देखील त्याने अंतिम पाच स्पर्धकात धडक मारुन छाप पाडली होती. संभाजीनगरच्या कांचनवाडी भागात राहणाऱ्या रविंद्र खोमणेवर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रविंद्र सुखदेव खोमणे याने बालपणापासूनच संगीत व नाटक कलेकडे आपला ओढा असल्याचे दाखवून दिले. सुरुवातीला गारजगाव येथे गायलेल्या बोबड्या आवाजातील ‘आई-बापाच्या गळ्याला दोरी, बायकोला खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी’ हा अभंग त्याने सादर केला आणि तो गावात घरोघरी पोहोचला. तिथूनच त्याला गायनाची गोडी लागली आणि वेगवेगळ्या नाटकांमध्ये, कार्यक्रमामध्ये त्याने गाण्यास सुरुवात केली. त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रोत्सहान दिले. 2008 साली सरगम कंपनी मुंबई यांनी वेड्या बाळा, गण गौवळण रंगबाजी अशा दोन कॅसेटमध्ये त्याला संधी दिली. अशा वेगवेगळ्या गीत, भावगीत व लोकसंगीताच्या 16 कॅसेटमधून तो चमकला. वेडा बाळ्या व लाडका जावई हे दोन्ही गीते आज कृणाल कंपनीच्या कॅसेटच्या माध्यमातून खोमणे घरोघरी पोहचली आहेत. 2007 पासून पं.नाथ नेरळकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास प्रारंभ केला. अजूनही तो त्यांच्याकडेच हे संगीत शिकत आहे. देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना गायनाचे कित्येक पुरस्कार त्याला मिळाले. 2006 साली नारायणगाव येथे तमाशा स्पर्धेत, 2014 साली ईटीव्ही मराठी स्पर्धेत व 2017 साली पुणे जिल्ह्यातील वेहळा येथे झालेल्या संगीत स्पर्धेत तो चमकला आणि त्याने पारितोषिकेही प्राप्त केली. 2017 साली नांदेड येथे आवाज महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील त्याने प्रथम पारितोषिक पटकाविले. 2018 साली म्हणजे चालू वर्षी झी युवाच्या संगीत सम्राट महासंग्राम या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला. सुरुवातीला राज्यातील बारा दिग्गज कलावंत यात सामील झाले होते. अंतिम टप्प्यात अंजली गायकवाड, ईशीता विश्वकर्मा, हरगून कौर, मानसी जोशी, फोक रिव्हायल जालना, सोहम-अक्षया जोडी यांनी बाजी मारली आणि बारामती येथे 5 नोव्हेंबर रोजी संगीत सम्राट महासंग्रामचा शेवटचा कार्यक्रम घेण्यात आला.

sangeet-samrat-ravindra-khomane

राहूल देशपांडे, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे हे या स्पर्धेचे परीक्षक होते. गेली तीन महिन्यापासून ही स्पर्धा सुरु होती. प्रत्येक गाण्याचे व्यवस्थित सादरीकरण आणि सराव यामुळे रविंद्र खोमणे हा 2018 चा संगीत सम्राट महासंग्रामचा महाविजेता ठरला आहे. त्याला दोन लक्ष रुपयांचे पारितोषिक आणि विविध बक्षीसे प्रदान करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण पार पडले. यावेळी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या विजयाबद्दल खोमणे यांनी ‘सामना’शी बोलतांना सांगितले की, नवोदित कलावंतांची सध्या जोरदार तयारी सुरू असून त्यांनी दाखविलेली कला आश्चर्यकारक व तरबेज आहे. संगीत क्षेत्रात सरावाला महत्व असल्याने जोपर्यंत गाणे मनाला पटणार नाही तोपर्यंत मी सराव केला. त्यामुळेच आपण हे यश प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले. रविंद्रचे वडील शाहीर सुखदेव खोमणे व शाहिर उषा खोमणे या दोघांच्याही मार्गदर्शनामुळे रविंद्रला ही संधी व हा विजय प्राप्त होऊ शकला. आपली पत्नी श्रद्धा देवचके (खोमणे) हीने दिलेली साथ आणि पाठबळ ही देखील आपल्यासाठी महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले. या गुणी कलावंताच सर्व महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.