लातूरात नो पार्किंग, नो स्टॉपींग झोन फक्त फलकावरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शहराची ओळखच अतिक्रमणयुक्त शहर अशी झालेली आहे. शहरातील चौक असो अथवा रस्ता वाहतूकीसाठी नाही तर अतिक्रमण करुन आपला व्यवसाय थाटण्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे. नो पार्किंग, नो स्टॉपींग झोन सध्या केवळ फलकावरच आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच नाही. शहरातील गांधी चौकात अनेकजण दुकाने थाटून बसलेले आहेत. महानगर पालिका आणि वाहतूक शाखा हे सर्व पाहूनही त्याकडे जाणिवपुर्वक दुलक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

लातूर शहर महानगर पालिकेच्यावतीने शहरातील कांही चौकात नो पार्किंग, नो स्टॉपीग झोन जाहिर करण्यात आले. रस्ता सुरक्षा समितीची अधिसुचना ११ फेब्रुवारी २०१४ अन्वये शहरातील सर्वच प्रमुख चौकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कोणी करावयाची आहे हाच खरा प्रश्न आहे.

लातूर शहरातील सर्वच प्रमुख रस्तेच काय पण गल्लीबोळातील रस्तेही अतिक्रमणयुक्त आहेत. महानगर पालिकेच्यावतीने कांही चौकात फलकही लावण्यात आलेले आहेत. हा चौक नो पार्किंग, नो स्टॉपींग झोन म्हणून जाहिर करण्यात आलेला आहे.परंतू अनेकजण थेट या फलकाच्यासमोरच वाहने लावतात.

चहाचे गाडे, नाष्ट्याचे गाडे, पावभाजीचे गाडे, पाणीपुरीचे गाडे, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, यांनी चौकात ठाण मांडलेले आहे. गांधी चौकातील या अतिक्रमणाकडे सर्वजण जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहराती रस्ते हे वाहतूकीसाठी खुले करण्याची गरज आहे परंतू अनेक रस्ते थेट व्यवसायासाठीच आंदण दिलेले आहेत.

दयानंद महाविद्यालयाजवळील रस्ता महाविद्यालयात आलेल्या, दुकानात आलेल्या दुचाकीस्वारांनी अडवलेला आहे. तर एक बाजू फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी अडवलेली आहे. शहरातील रस्ते आणि चौक कधी मोकळा श्वास घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.