
सामना ऑनलाईन । लखनौ
पगार मागितला म्हणून एका माणसाने महिला कर्मचाऱ्याचे कपडे फाडल्याची घटना घडली आहे. पीडिता तिचा थकलेला पगार मागायला गेली असताना हा प्रकार घडल्याचा आरोप तिने केला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार गाझीपूर येथील मार्केटमध्ये घडला. मार्केटमधील एज्युकेशन गुरू करिअर सोल्युशन नावाच्या कंपनीत पीडिता दरमहा सात हजार रुपये वेतनावर नोकरी करत होती. दोन महिन्यांपासून तिला पगार मिळाला नव्हता. त्यामुळे रविवारी पीडिता आपला थकलेला पगार मागण्यासाठी कंपनीत गेली होती. तिथे तिने कंपनीचा मालक फरहान याच्याकडे पगाराची मागणी केली. पण त्याने पगार देण्यास टाळाटाळ करत तिच्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. तिने त्याला विरोध केला असता त्याने तिचे कपडे फाडले.
त्याच्या तावडीतून कशीबशी निसटत पीडितेने घर गाठलं आणि सरळ पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपासही सुरू आहे.






















































