कुणी स्मारक बांधता का स्मारक? भारतरत्नांची जन्मभूमी स्मारकाविना उपेक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शशांक सिनकर, मुंबई

‘धर्मशास्त्राचा इतिहास’ लिहिला म्हणून 55 वर्षांपूर्वी ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केलेल्या पां. वा. काणे यांची कोकणातील जन्मभूमी मात्र या सुपुत्राच्या स्मारकाविना अजूनही उपेक्षितच आहे. जगाला हिंदू धर्माची महती सांगणाऱया तसेच प्रत्यक्षात अस्पृश्यता निवारण करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करणाऱया या कोकणपुत्राचे त्याच्या गावी साधे का होईना एखादे स्मारक असावे यासाठी रत्नागिरी, जिल्हा खेड तालुक्यातील मुरडे गावचे ग्रामस्थ तसेच काणे कुटुंबीय सरकारदरबारी खेटे घालीत कुणी स्मारक बांधता स्मारक, अशी याचना करीत आहेत.

भारतरत्न, महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 7 मे 1880 रोजी त्यांच्या आजोळी परशुराम या गावी झाला. त्यांचे वडील मुरडे गावी भिक्षुकी करीत असत म्हणून ‘पां.वा.’ हे मुरडे येथे आले. 1897 साली पी. जी. मिशन स्कूल, दापोली येथून मॅट्रिकची परीक्षा दिली. ते शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1897 साली प्लेगची मोठी साथ आल्याने मुंबईला न जाता विल्सन कॉलेजचे प्राचार्य डॉ. मचिहन यांनी बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला. परिस्थिती नसल्यामुळे पुढील शिक्षण घेणे शक्य नसल्याने त्यांनी 1904 मध्ये रत्नागिरी येथे सरकारी शाळेत नोकरी स्वीकारली.

पां. वा. काणे यांचे कार्य
1918 पासून वकिली
1919 ते 1929 बॉम्बे विद्यापीठातील सिनेट सदस्य
1938 पासून बॉम्बे एशियाटिक असोसिएशनचे सदस्य
1942 साली ब्रिटिश सरकारने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली
1947 साली मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू
1948 साली पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय पौर्वात्य परिषदेसाठी निवड
1953 साली राज्यसभेचे सन्माननीय सदस्य म्हणून निवड
1959 साली हिंदुस्थान सरकारने राष्ट्रीय प्राच्य विद्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.
1963 साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान.

महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा, धर्मात केलेल्या सुधारणा यामुळे हिंदुस्थान सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरवले. या भारतरत्नाचे त्याच्या जन्मगावी स्मारक व्हावे एवढीच आमची इच्छा आहे.
-श्याम काणे, मुरडे ग्रामस्थ