
सामना प्रतिनिधी, उरण/चिरनेर
उरण, पनवेल मार्गावरील चिर्ले गावात आज सकाळी वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर यार्डला भीषण आग लागली. त्यात 16 कंटेनर्स जळून खाक झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही प्राणीहानी झाली नाही. या कंटेनरमधील घातक केमिकलच्या आगीचे लोट अक्षरशः आकाशाला भिडले होते. कंटेनर यार्डमधील अतिज्वलनशील रसायनांच्या टाक्या पेटल्या असत्या तर क्षणार्धात चार हजार लोकवस्तीचे चिर्ले गाव बेचिराख झाले असते. केवळ दैव बलवत्तर म्हणून ‘भोपाळ’ होता होता वाचले. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तास झुंज दिल्यानंतर आग आटोक्यात आली.
उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वैष्णो लॉजिस्टिक यार्ड असून तेथे बेकायदेशीरपणे रसायनांचे कंटेनर्स ठेवण्यात आले आहेत. लॉजिस्टिक यार्ड ही कंटेनर हाताळणारी कंपनी असून जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात केल्या जाणाऱया विविध प्रकारच्या मालाचे कंटेनर्स ठेवले जातात. याच गोडाऊनमध्ये विविध प्रकारचे घातक रसायन (हजार्डस) देखील साठवून ठेवण्यात आले आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास महाकाय कंटेनरला अचानक आग लागली आणि काही क्षणातच ज्वलनशील रसायनामुळे ही आग भडकली. त्याच ठिकाणी टायरचे कंटेनरदेखील होते, तेही पेटले.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक भयभीत
आगीची भीषणता एवढी जबरदस्त होती की, त्याच्या ज्वाळा व धूर आकाशात दूरवर पसरल्या. चिर्ले या गावातील रहिवाशी भयभीत झाले. आगीचे वृत्त समजताच सिडको, ओएनजीसी, जेएनपीटी तसेच नवी मुंबई येथून अग्निशमन दलाच्या बारा गाडय़ांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बहाद्दर जवानांनी पाच ते सहा तास झुंज देत आग आटोक्यात आणली. केमिकलमुळे अनेकांना श्वास घेणेदेखील मुश्कील झाले होते. वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर यार्डला लागूनच चिर्ले हे गाव असल्याने आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीमुळे चिर्ले गावातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला भयभीत झाले आहेत.
आमच्या सुरक्षेचे काय?
जेएनपीटी बंदर जवळ असल्याने उरण-पनवेल मार्गावर रस्त्यालगतच कंटेनर्सचे अनेक गोडाऊन्स आहेत. आज लागलेल्या भीषण आगीमुळे चिर्ले ग्रामस्थ हादरले असून अशी घटना पुन्हा घडल्यास आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान कंटेनर यार्डमध्ये मालाची साठवणूक करताना अतिज्वलनशील पदार्थ ठेवले जातात. ही धक्कादायक बाब असून हजारो ग्रामस्थांच्या जिवाशी खेळणाऱया संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी मागणी जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली कशी?
उरण-पनवेल मार्गावर थाटण्यात आलेली अनेक गोडाऊन्स बेकायदेशीर असून त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंत्रालयातील अधिकाऱयांशी साटेलोटे करून कंटेनर्स कंपन्यांचे मालक बिनधास्तपणे गोडाऊन थाटतात आणि तेथे घातक केमिकलचे ड्रम्स आणि कंटेनर्स ठेवतात. हा प्रकार म्हणजे जणू बॉम्बच आहे. वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये आज लागलेली आग ही चिंताजनक असून तेथे ज्वलनशील रासायनिक पदार्थ ठेवायला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली तरी कशी? असा सवाल उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी केला आहे.































































