
सामना ऑनलाईन,मुंबई
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे स्मारकाला अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या अनुयायांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवासुविधांचा आजपासून प्रारंभ झाला.
महापालिकेकडून प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध नागरी सेवासुविधा अधिकाधिक दर्जेदार व सुसज्जरीत्या पुरविण्याचा प्रयत्न असतो. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या नागरी सेवासुविधांचा लाभ अनुयायांनी घ्यावा, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. देशविदेशातून येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क व परिसरात चोख व्यवस्था तसेच सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत . शिवाजी पार्क व परिसरात अनुयायांना सेवासुविधा पुरविण्यासाठी झटणाऱ्या सर्व कर्मचारी –अधिकारी यांचे महापौरांनी विशेष कौतुक केले.
चैत्यभूमी येथे जनसंपर्क विभागामार्फत ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिकेच्या एक लाख प्रती मुद्रित करण्यात आल्या असून चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन व्हावे यासाठी ही पुस्तिका विनामूल्य वितरित करण्यात येत आहे.
या आहेत सुविधा
- आपत्कालीन परिस्थितीत दहा हजार अनुयायांची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था.
- दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या सात शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
- या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या असून सुमारे दहा हजार अनुयायांची त्यात व्यवस्था होऊ शकते.
- चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
- चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्यसेवा.
- एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
- शिवाजी पार्क मैदान व परिसरात 18 फिरती शौचालये (180 शौचकुपे).
- रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी 4 फिरती शौचालये (40 शौचकुपे).
- 380 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
- पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स.
- मोबाईल चार्जिंगकरिता शिवाजी पार्क येथे 300 पॉइंटची व्यवस्था.
- फायबरच्या 200 तात्पुरत्या स्नानगृहांची व 60 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.
- इंदू मिलमागे फायबरच्या तात्पुरत्या 60 शौचालयांची व 60 स्नानगृहांची व्यवस्था.
- रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेल्या 150 बाकडय़ांची व्यवस्था.
- शिवाजी पार्कव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेदेखील तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालये.
- स्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.
- अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
- चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहित बोटीची संपूर्ण परिसरात व्यवस्था.
- मोठय़ा पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
- 469 सॅटॉल्स्ची रचना.
- दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्काऊट-गाईड हॉल येथे भिक्कू निवासाची व्यवस्था.
- मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरिता 100 फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुग्याची व्यवस्था.
चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांचा आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. शिवाजी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, उपमहाव्यवस्थापक आर. जे. सिंह यावेळी उपस्थित होते.





























































