एका मिनिटाला मुंबईत काय होतं, सीएसटीच्या मुतारीत 180 जण शिरतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना मिनिटच काय तर सेकंदासेकंदाचा हिशेबही ठेवावा लागतो. येथे दहा सेकंदांचा जरी फरक पडला तरी मुंबईकरांची गोची होऊ शकते. त्यामुळे मुंबईत सर्वच जण घाईत पळत असतात, रांगा लावत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात तर पिकअवरमध्ये मुंगी शिरायलाही वाव नसतो तर इतर बाब अलहिदा… सीएसएमटी स्थानकाच्या स्वच्छतागृहात मिनिटाला 180 प्रवासी शिरतात असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोजणी केली असता निष्पन्न झाल्याने अधिकारीही चक्रावले.

चर्चगेट असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, येथे सायंकाळी जर एखादा गर्दीच्या प्रवाहाच्या विरुद्ध चालायला गेला तर त्याची काही शामत नसते. छातीचा कोट करून लढाईला जाण्याच्या आवेशात लोकल पकडायला निघालेल्या मुंबईकरांशी त्याचा कपाळमोक्ष होण्याचाच धोका अधिक असतो. त्यामुळे वाट बदलावीच लागते, नाहीतर त्याचे काही खरे नाही. लोकल स्थानकात शिरायचा अवकाश आणि महिला पदर कंबरेला खोचून पर्सची ढाल करीत लोकलवर तुटून पडण्याच्या आवेशात असतात. अशावेळी एखादा नवख्याने लोकलमधून उतरण्यास सेकंदाचाही उशीर केला तर त्याला ‘नया आया है क्या’ असे ऐकावे लागते.

सीएसएमटीच्या उपनगरीय प्रवाशांसाठीच्या भव्य सार्वजनिक मुतारीत एका मिनिटात कितीजण शिरतात याची गणती डीआरएम कार्यालयाने नुकतीच केली तेव्हा त्यावेळी त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यासाठी अधिकारी घड्याळ लावून तेथे इन्स्पेक्शन करण्यास उभे राहिले तेव्हा पिकअवरला एका मिनिटाला तब्बल 180 प्रवाशांनी तेथे प्रवेश केल्याची नोंदणी झाली.

एका चौरस मीटरमध्ये 16 प्रवासी उभे
लोकलच्या एका डब्यात गर्दीच्या वेळी साधारण 350 प्रवासी असतात. त्यापैकी 104 जण बसलेले असतात. म्हणजेच 246 प्रवासी उभ्याने प्रवास करत असतात. एका लोकलमध्ये एक चौरस मीटर जागेत 16 प्रवासी दाटीवाटीने उभे असतात. अर्थात 2005 पर्यंतची ही स्थिती आहे. त्यास रेल्वेच्या घनतेच्या व्याख्येत ‘सुपरडेन्स क्रश लोड’ असे म्हणतात.

पावणे दोन मिनिटांत विमानांचे उड्डाण
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावणे दोन मिनिटाला एका विमानाचे उड्डाण होते. 2017 मध्ये एकच धावपट्टी वापरावी लागत असतानाही 24 तासांत 969 विमानांचे उड्डाण किंवा लँडीग करून नवा विक्रम केला होता.

सीएसएमटीच्या मुतारीत पिकअवरच्या गर्दीमध्ये एका मिनिटात 180 जण शिरतात. ही संख्या मोठी असल्याने या मुतारीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. एसीही लावला आहे. मंद संगीताची धूनही ऐकू येण्यासाठी स्पीकर आणि स्वयंचलित परफ्युम स्प्रे यंत्रणेची सोय करण्यात आली आहे.
-एस. के. जैन, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे

एका लोकल डब्यातील प्रवासी संख्या
साल – मध्य रेल्वे  –   पश्चिम रेल्वे
2006-07 –  289  –  288
2011- 12 –  226 – 241

लोकलमध्ये पाच हजार प्रवासी शिरतात

  • एका 12 डब्यांच्या लोकलची क्षमता साधारण 3000 असते. मात्र, गर्दीच्या वेळी त्यात पाच हजारांहून अधिक प्रवासी शिरलेले असतात. आणि ती एका काय अर्ध्या मिनिटांत ‘फुल्ल’ होते.
  • रेल्वे स्थानकांवर अलीकडेच बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांची प्रवासी क्षमता एका मिनिटांना 150 प्रवाशांना प्रवेश मिळण्याची ठेवण्यात आली आहे. तर दर तासाला नऊ हजार प्रवासी वाहण्याची क्षमता सरकत्या जिन्यांमध्ये आहे.