पोलिसांच्या भीतीने चोराची शक्कल; चोरीची बुलेट बदलली, पण नंबर प्लेटने लटकवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रस्त्यावर पार्क केलेल्या गाडय़ा चोरून त्या विकणाऱया दोघांना गोवंडी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांच्याकडून आणखी गाडय़ा मिळतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अमेय चव्हाण (21) आणि अक्षय हळदणकर (20) अशी त्या चोरांची नावे आहेत. गोवंडी पोलीस ठाण्यात एक बुलेट चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज गायकवाड अंमलदार नाळे, अभंग, तडवी आणि रोडे हे तपास करीत असताना त्यांना अमेय चव्हाण या तरुणाकडे ती बुलेट असल्याची खबर मिळाली. त्यामुळे पोलीस अमेयचा शोध घेऊ लागले. तेव्हा पोलीस आपल्याकडे येणार असल्याचे समजताच अमेयने आयडिया केली. त्याने चोरीची बुलेट मित्राकडे नेऊन ठेवली आणि जशीच्या तशी हुबेहुब मित्राची बुलेट थोडय़ा वेळाकरिता घेऊन आला. त्यानंतर पोलीस त्याच्याजवळ गेले व बुलेटची चौकशी केली असता गाडीचा नंबर वेगळाच होता. शिवाय मित्राची बुलेट असून एका कामासाठी घेतल्याचे अमेय म्हणाला. परिणामी पोलीस केवळ चौकशी करून माघारी परतले.

पण त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केल्यावर अमेयची आयडिया उघडकीस आली. पेलीस त्याच्याजवळ जाण्याआधी तो एक बुलेट घेऊन गेला होता आणि थोडा वेळाने बुलेटवरूनच परतला होता. मात्र दोन्ही बुलेटचा नंबर वेगळा असल्याचे समोर आले. त्यामुळे गायकवाड यानी अमेयला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.

दोघे मिळून गाडय़ा चोरतो
अमेयने गुह्याची कबुली देतानाच अक्षय हळदणकर यांच्या जोडीने गाडय़ा चोरून त्या विकत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अक्षयलादेखील अटक केली. त्यानंतर दोघांनी चोरलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात यश आले. त्यांच्याकडून आणखी गाडय़ा हस्तगत करायच्या असल्याचे गोवंडी पोलिसांनी सांगितले.