
>> अभिजित पानसे
कही द्वंद्वं चिरकालीन असतात. त्यात चहा महान की कॉफी ग्रेट हे एक द्वंद्व चहाभक्त आणि कॉफीभक्तांमध्ये कायम असतं. याचं एक पक्कं उत्तर कोणी देऊ शकत नाही. मला चहा आणि कॉफी म्हणजे अनुक्रमे ‘अँड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ वाटतात. कॉफी ही आयफोन ऑपरेटिंग सिस्टमसारखी आहे. महागडी, खास, स्वतःचं व्हीआयपीपण जपणारी, सर्वसामान्यांमध्ये न मिसळणारी, आपलं वेगळेपण जपणारी. चार भिंतीच्या आतच प्राशन करावीशी वाटणारी. चहा मात्र अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसारखा. सहज ऍक्सेसिबल. अँड्रॉइड म्हणजे स्वातंत्र्य. आझादी आझाद. आझादी हमे चाहिये आझादी!
चहा कुठेही कधीही मिळतो. चहासोबत काहीही करता येतं. कधीही पिता येतो. सर्वसामान्य जनतेपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वाना आवडतो. जनतेची सकाळची सुरुवात ही मोबाईलदर्शनानंतर चहानेच होते. कॅफे कॉफी डेमध्ये तोऱयात, श्रीमंतीत वावरणारी कॉफीच्या नशिबी अद्याप ‘कॉफी डे’ मात्र नाही. ते भाग्य उदयास आलं चहाचं. गेल्या पंधरा वर्षांपासून चहा दिन, ‘टी डे’ साजरा केला जातो. चहाच्या योगदानाला शेवटी न्याय मिळाला म्हणायचं तर. चहा उत्पादक आशियाई देशांनी मिळून ‘टी डे’ ठरण्यात पुढाकार घेतला. जगात चहाच्या व्यापारासंबंधित, कामगारांबद्दल जागृती निर्माण करणे हा यामागील उद्देश.
चहाचे शौकीन जगभर आहेत, पण आशियाई देशात त्यामानाने अधिकच. हिंदुस्थानात तर चहा म्हणजे पाहुण्यांना देण्यात येणारं प्रथम पेय. पूर्वी बाहेरून येणाऱया पाहुण्याला गूळपाणी देण्यात येई. आता पाणी चहा देण्यात येतो. मग त्या चहात कितीही पाणी असो. महाराष्ट्रात तर चहाचे खास वापरातील विविध प्रकार बघायला मिळतात. ‘बासुंदी चहा’ हा असाच एक प्रकर. अतिगोड असलेला चहा हा पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने चहा टपरीवर मिळतो. साधा चहा, ‘पानी कम चहा’, ‘पेशल चहा’ असे खास पाणी आणि दूध यांच्या ‘गुणोत्तरा’वर आधारित चहा मिळतात.
सध्या चुलीवरील खाण्याची, विकण्याची लहर पसरली आहे. आइस्क्रीम सोडल्यास सगळं काही चुलीवरचं विकताना दिसतंय, पण ‘चुलीवरचा चहा’ मात्र अजून हायवेवर प्रसिद्ध झाला नाहीये. हा सोपा ‘फुलटॉस’ सुटलाय. कदाचित चुलीवरच्या चहाची मार्केटिंग करण्याची गरजच नाही. तो सहजपणे जेव्हा बाहेर कुठे मिळतो, किल्ल्यावर एखाद्या चार लाकडांवर प्लॅस्टिक कापड टाकून उभारलेल्या दुकानात मिळतो तेव्हाही तो ‘अमृततुल्य’ वाटतो. चहा कधीही, कुठेही प्याला जातो. आवडतो. कॉफीसाठी खास वेळ, तशी इच्छा, कंपनी, खास वातावरण लागतं. असला ‘तामझाम’ चहाला लागत नाही. चहाची ‘लत’, तलफ असते. कॉफीच्या नशिबी ते नाही.
चहा हीच एक स्वतंत्र संस्कृती आहे. या संस्कृतीचा इतिहासाची पाळेमुळे चीनपर्यंत आहेत. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की चहाचं व्यसन इंग्रजांनी लावलं. पण हिंदुस्थानात इंग्रजांनी चहा आणण्यापूर्वीच चहाचा शोध हिंदुस्थानातील पूर्वोत्तर भागातील पहाडी भागांत लागला होता. इंग्रजांनी हिंदुस्थानात चहाचं फक्त ‘मार्केट’ तयार केलं. चहा हा चीनच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. जेवतानासुद्धा त्यांच्या शेजारी चहाचं वाडगं असतं. इंग्रजांनी हिंदुस्थानींना उत्तर हिंदुस्थानात अफू पिकवायला लावून चीनमध्ये अफीम विकायला सुरुवात करून प्रचंड महसूल मिळवला. पुढे चीनने इंग्रजांना चहा विकून फिट्टंफाट, फिट्टूस केलं. इंग्रजांनी त्या चहाचं व्यसन हिंदुस्थानींना लावलं. या सगळ्यात सँडविच झाले ते हिंदुस्थानी. असो सँडविचसोबत वाफाळलेला चहा मस्त वाटतो.
हिंदुस्थानात चहा उत्पादक राज्ये उत्तर पूर्वेकडून दक्षिणेपर्यंत आहेत. यात आसाम आणि दार्जिलिंग सगळ्यात प्रसिद्ध. दक्षिणेकडे केरळमध्ये तर चहाच्या मळ्यांसोबत चहाचे म्युझियमसुद्धा आहे. मुन्नारचे टी म्युझियम फार प्रसिद्ध आहे. हे म्युझियम बघितल्यावर व्यक्तीचा चहाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. चहा प्राशन करताना वेगळा भाव, इमोशन निर्माण होतात. कपातील चहाबद्दल आदर निर्माण होतो.
आसामचा चहा हा जास्त तीव्र आणि मादक मनाला जातो. तर दार्जिलिंगच्या चहाचा ‘अरोमा’- सुगंध, चव प्रसिद्ध आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने चहाच्या मळ्याला भेट द्यावी. कोंकणात आंब्याच्या बागा जशा मनाला आनंद, शांती देतात तसे चहाचे मळेसुद्धा मनाला विलक्षण आनंद, उत्साह, स्फूर्ती देतात. चहाच्या मळ्यातील मादक सुरेख सुगंध ताजातवाना करतो.
दूरवर हिरवेगार पसरलेले चहाचे मळे, पाठीमागे विशिष्ट पिशव्या बांधलेल्या चहाची पाने खुडणाऱया गावातील बाया, सारंकाही सुंदर दिसतं.
चहासोबत चहा ज्यातून प्राशन केला जातो त्या साधनाचाही मानसिक परिणाम होतोच. स्वच्छ शुभ्र मोठय़ा चिनीमातीच्या कपात चहा पिताना वेगळा आनंद वाटतो. रस्त्यावर टपरीवर कित्येक वर्षे जुन्या छोटय़ा कपातूंन किंवा काचेच्या छोटय़ा पेल्यांतून चहा वेगळा वाटतो. उत्तरेकडे मातीच्या कुलहडमधून चहा पिण्याच्या आनंदास तोड नाही.
रेल्वेच्या स्लीपर्स कंपार्टमेंटमधून पहाटेपासून ‘चायेइय्या… चायेय्या… अशा विशिष्ट टोनमध्ये बोलून झोपमोड करणाऱया चाहवाल्याचा राग येत नाही. उलट-
‘चहावाला आला हो चहावाला आला
सकाळच्या पारी हरिनाम बोला!
नाही कुणी जागं झोपलं पहारा
उपाशी जीव तुला चहाचाच सहारा
तुझ्यासाठी अमृत चहाचंच झाला
चहावाला आला हो चहावाला आला…’
असं गावंसं वाटतं.
(असो. या ‘रिमिक्स’, संस्कारित गाण्याचा आणि येत्या 2019 लोकसभा निवडणुकींचा संबंध लावू नये बरं का!)
रेल्वेतील चवीच्या दृष्टीने सगळ्यात वाईट दर्जाचा पाणचट चहाही ‘साईड लोवर सीट’वर बसून खिडकीतून बाहेर बघताना प्रवासाची लज्जत वाढवतो.
चहामधील हिंदुस्थानात अविभाज्य घटक म्हणजे दूध. यातही म्हशीच्या दुधाचा चहा, गायीच्या दुधाचा चहा, शेळीच्या दुधाचा चहा असे चवी बदल घडवतात.
गुळाचा कोरा चहा हा एक स्वतंत्र विषय आहे. एकेकाळी गरीबांचा हा चहा सध्या प्रसिद्ध होतोय. पारंपरिक काळ्या चहासोबत त्याचा हाय प्रोफाइल, उच्चभ्रू भाऊ आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतोय, तो ‘ग्रीन टी.’ या पारंपरिक चहाचे आजोबा, पितामह म्हणजे ‘हर्बल टी.’ याचीही फार डिमांड वाढतेय.
चहा करते, चहा टाकते, चहा ठेवते म्हणा, काहीही म्हणा; येथे क्रियापदे महत्त्वाची नसून चहाटळांसाठी, चहाबाजांसाठी ‘कृती’ महत्त्वाची असते. येथे शब्द ‘फिके’ ठरतात, चहाच्या ‘तेज’ चवीशीच संबंध उरतो.
चहाच्या एका कपावर भांडणं सुटतात, चहाच्या एका कपावर शर्थी लागतात. संबंध जुळतात. चाय पे राजकीय चर्चा होतात. चाय पोटाची भूकही मंदावून तात्पुरता आराम देतो. चहाच्या भरवशावर कलाकार, विद्यार्थी रात्रभर जागून यश कमवतात. कायम आपल्या रुबाबात, तोऱयात, ऑटिटय़ुडमध्ये राहणारी कॉफी जेव्हा चहाला म्हणत असेल ‘आज मेरे पास कॅफे कॉफी डे है! पैसा है, ऐषो आराम है! तुम्हारे पास क्या है?’
तेव्हा चहा म्हणत असणार, ‘बहना, मेरे पास पब्लिक है!’




























































