
सामना प्रतिनिधी, नगर
गेला महिनाभर रणधुमाळी सुरू असलेल्या नगर महापालिकेसाठी उद्या (दि. 9) मतदान होणार आहे. महापालिकेच्या 68 जागांसाठी 339 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. एकूण 337 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून अतिसंवेदनशील 41 मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2 लाख 56 हजार 719 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नगर महापालिकेसाठी गेल्या महिन्यापासून रणधुमाळी सुरू होती. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी आणि जाहीर सभांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे येथील मतदानाकडे सर्व राज्यांचे लक्ष लागले होते. उद्या (दि. 9) महापालिकेसाठी मतदान होणार असून अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उभे आहेत. अनेक प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी लढत होणार आहे. नगर महापालिकेसाठीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह आचारसंहितेचे पथक या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. मतदान केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. मोबाईल व अन्य साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. 17 प्रभागांत एकूण 2000 मतदान यंत्रांवर मतदान होणार असून साधारणतः 750 ते 800 मतदारांचे केंद्र आहे अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.
धुळ्यात 74 जागांसाठी टक्कर
धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी उद्या (रविवारी) 9 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. सोमवारी 10 डिसेंबरला येथील शासकीय गोदामात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या 74 जागांसाठी 355 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरातील 450 मतदान केंद्रांवर ही निवडणूक पार पडणार असून 120 बूथ संवेदनशील आहेत. या निवडणुकीत 3 लाख 29 हजार 569 मतदान असून त्यामध्ये 1 लाख 54 हजार 860 महिलांचा समावेश आहे. मतदार प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी 2 हजार 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.






























































