बुलढाण्यात नव्याने उभारणार 136 पेट्रोलपंप; 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

जिल्हाभरात नव्याने 136 पेट्रोलपंपांची निर्मिती करण्यास शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाने मान्यता दिली असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून 24 डिसेंबर ही अर्ज करण्याची अखेरची मुदत असल्याची माहिती इंडियन ऑइलचे विभागीय व्यवस्थापक तथा जिल्हा समन्वयक विनायक चावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पेट्रोल व डिझेलची वाढती मागणी पाहता पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी, बीपीसीएल, एचपीसीएल व आइओसीएल) पेट्रोलपंपांचा विस्तार सुरू केल्याचे सांगून विनायक चावरे म्हणाले, राज्यभरात इंडियन ऑइलचे 3 हजार पेट्रोलपंप उभारले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात नव्याने निर्माण करण्यात येणार्‍या पेट्रोल पंपांमध्ये इंडियन ऑइलचे 66, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम प्रत्येकी 35 अशा 70 पेट्रोलपंपांचा समावेश असणार आहे. स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी वा वारस, माजी सैनिकांसोबतच खुला प्रवर्ग, इतर मागस प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना पेट्रोलपंपासाठी अर्ज करता येणार आहे. पंपाकरिता जमीन आवश्यक आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही तेसुद्धा अर्ज करू शकतील, मात्र त्यांना मागणी केल्यानंतर जमीन उपलब्ध करावी लागणार असल्याचे चावरे यांनी स्पष्ट केले. अधिक पारदर्शकतेसाठी ड्रॉ पद्धतही राबविली जाणार आहे.

बेरोजगारांना मिळणार रोजगार
यापूर्वीच जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमचे मिळून 136 पेट्रोलपंप कार्यान्वित आहेत. त्यात आता पुन्हा 136 ची भर पडून पंपांची संख्या 272 होणार आहे. एका पंपावर 6 ते 7 कर्मचार्‍यांची गरज भासणार असल्याने सुमारे 1 हजार बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.