
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई पालिका ठाणेकरांना देत असलेल्या दररोजच्या 150 दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ावर 50 टक्के पाणीपट्टी वाढणार आहे. गेल्या 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही वाढ केली जाणार आहे. नगरबाह्य विभागातील पाणीपट्टीत वाढ करण्याच्या धोरणांतर्गत ही दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून त्यानंतर याची अंमलबजावणी होईल.
मुंबईला दररोजसाठी आवश्यक असणारा 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांतून केला जातो. यातील 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे-भिवंडीला दिले जाते. ठाणे जिह्यात या पाण्याचा वापर ग्राहक घरगुती व व्यावसायिक कामासाठी करतात. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 288 नुसार ठाण्याला हा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या पाणीपुरवठय़ाच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीत लागू असलेले दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे पालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही सुधारित दरवाढ करण्यात येणार आहे. यानुसार शुद्ध पाणीपुरवठय़ाच्या दरात 50 टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे.
महसुलात वार्षिक 14.58 कोटींची वाढ होणार
n सध्या ठाणे पालिका क्षेत्राला आवश्यक असणारे 700 दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून पुरवण्यात येते. यामध्ये मुंबई पालिकेकडून दररोज 150 दशलक्ष लिटर पाणी मिळत असल्यामुळे ठाणेकरांची पाण्याची मोठी गरज भागते.
n पाणीपुरवठा दरातील वाढीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात वार्षिक सुमारे 14.58 कोटींची वाढ होणार आहे. ही वाढ महानगरपालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून 30 दिवसांनी आणि 90 दिवसांपूर्वी अमलात येईल.





























































