मराठीची सक्ती हा भाषेचा अपमानच! दिवाकर रावते यांचे परखड मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मराठी भाषा सक्तीची करून काही होणार नाही. उलट हा मराठीचा अपमानच आहे, असे परखड मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे आयोजित मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मराठी माझी आई आहे आणि ती माझ्या घरात राहिली पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवे, अशी इच्छाही दिवाकर रावते यांनी पुढे व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठी अभ्यास केंद्राचे तुषार पवार यांच्या ‘भाषा परिक्रमा’ या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ‘मातृभाषेतील शिक्षण आणि यशवंतांशी संवाद’ या सत्राने झाली. यावेळी ऍड. मीनल शृंगारपुरे, मानसोपचारतज्ञ प्रेरणा महाजन, मुंबई मनपा अभियंते ओंकार गिरकर या मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या मान्यवरांनी आपली यशोगाथा मांडतानाच मराठी भाषेतून शिक्षणाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. मातृभाषेतून शिकल्याने आम्हाला आमच्या कार्यक्षेत्रात कुठेही अडसर आला नाही. उलट मराठीतून शिकल्याने विषयाचे आकलन चांगल्याप्रकारे होते. मराठी शाळेने आम्हाला संस्कृती, संस्कार आणि शिकण्याचे कौशल्य दिले, असे सांगतानाच मायमराठीचा श्वास मराठी शाळा आहे. मराठी भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा जगायला हव्यात. आधी आपली मातृभाषा पक्की करा, मग उंच आकाशात उडायला सज्ज व्हा, असे मतही मान्यवरांनी परिसंवादात मांडले.

मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार आहोत? या चर्चासत्रात शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, आमदार अतुल भातखळकर, आमदार विद्या चव्हाण, मनसेचे अनिल शिदोरे सहभागी झाले होते.शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या शाळेचे रुपडेच बदलले. मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करून त्यांना टॅब वाटप केले. मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यावर भर दिला. त्यामुळेच पालिका शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले, याकडे अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. मराठी शाळांची गुणवत्ता वाढावी. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, अशी अपेक्षा भातखळकर यांनी व्यक्त केली.

मराठी शाळांना व्यापक सामाजिक पाठिंबा नाही अशी खंत अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली. मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि विस्तारीकरण ही या संमेलनामागची भूमिका आहे, असे मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार म्हणाले.

लोकसहभागातून निधी मिळवून देणाऱ्या शिक्षकांनाच पुरस्कार!
मराठी शाळांना टिकवण्यासाठी सरकार लोकसहभागाला प्रोत्साहन देत आहे. लोकसहभाग मिळवण्यासाठी सरकारने शिक्षकांमध्येच स्पर्धा लावली असून, लोकसहभागातून निधी मिळवून देणाऱ्या शिक्षकाला राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार दिले जातात, असा आरोप नांदेड येथील शाळेचे शिक्षक शिवाजी अंबुलेकर यांनी केला. मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपाय या चर्चासत्रात ते बोलत होते. मराठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने मुले कमी झाल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे म्हणाले. ज्या वस्तू महाग त्या वस्तू चांगल्या असा आपला समज आहे. इंग्रजी शाळांच्या बाबतीत हेच आहे. आता स्वभाषेची चळवळ निर्माण करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.