
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिका कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता नगरसेवकांचीही बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. येताना-जाताना अशा दोन्ही वेळेला उपस्थितीची नोंद होणार असल्याने सभागृह सुरू झाल्यानंतर हजेरी बुकावर सही मारून पळ काढणाऱ्या नगरसेवकांना आता चाप बसणार आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांमध्ये आणि खात्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. जुलै 2017 पासून हजेरीपट बंद करून बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी घ्यावी अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी साधकबाधक चर्चा करून निर्णय घेतात. सभागृहाबाहेर ठेवलेल्या उपस्थिती पटावर सही करून नगरसेवक आत येतात. परंतु बऱ्याच वेळा सही करून नगरसेवक सभागृहात न येता परस्पर निघून जातात. त्यामुळे सभागृहाच्या दरवाजावर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशीनसह सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी कोटक यांनी केली होती.
काही नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाची माहिती नसते. सभागृहात नागरी विकासकामांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते. विकासकामांना मंजुरी दिली जाते. धोरणात्मक निर्णयही घेण्यात येतात. अशावेळी नगरसेवकांची हजेरी अत्यंत महत्त्वाची असते. केवळ हजेरीच नाही तर पुरेसे संख्याबळही महत्त्वाचे असते. परंतु अनेक वेळा नगरसेवक सभागृहात हजर राहत नाहीत. काही नगरसेवक दोन दिवसांनंतर येऊन नोंदवहीत सही करतात असे आरोप झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशीन आणि सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. महापौरांनी ही मागणी मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली होती. आयुक्तांनी याचा निर्णय गटनेत्यावर सोपवला होता. गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.
महापौर-उपमहापौरांना वगळले
या हजेरीच्या पद्धतीतून महापौर व उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे. नगरसेवकांना मात्र बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनी मात्र याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांना वॉर्डातील कामे, अधिकाऱ्यांकडे पाठपुराव्यासाठी खेटे घालावे लागतात. त्यामुळे त्यांना ही पद्धत जाचक होऊ शकते, असा मुद्दा काही नगरसेवकांनी मांडला आहे.





























































