
सामना प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेने आता ‘प्रगती एक्स्प्रेस’च्या इंटेरिअर बदलून त्या अधिक सोयीसुविधायुक्त केल्यानंतर आता हाच प्रयोग पुण्यासह नागपूर, अमरावती तसेच सोलापूरला जाणाऱ्या इतर इंटरसिटी गाडय़ांमध्येही करण्यात येणार आहे. या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन तसेच इंद्रायणी एक्स्प्रेसला नवा साज मिळणार आहे. प्रसाधनगृहात नवीन टाइल्स, आकर्षक नळ तसेच गाडीची अंतर्बाह्यपणे संपूर्ण बदलण्यात येणार आहे. अशा दहा गाडय़ांना नवीन रंगरंगोटी केली जाणार आहे.
गाडय़ांचे अंतर्बाह्य रंगरूप बदलण्यासाठी ‘उत्कृष्ट’ नावाची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रथम मुंबई-पुणे धावणाऱया प्रगती एक्स्प्रेसच्या आयसीएफ निर्मित पारंपरिक कोचचा लूक संपूर्ण बदलण्यात आला आहे. ही गाडी 4 नोव्हेंबरपासून सेवेत आली आहे. पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम, कोच इंडिकेशन बोर्ड, आरामदायी खुर्च्या, अंध प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीतून सूचना, चार्जिंगसाठी अॅक्रॅलिक मोबाईल होल्डरची सोय, सामान ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे रॅक, डब्यांना ऍण्टी ग्राफिटी रंग, स्वच्छतागृहात फायबर बेसिन, न घसरणाऱया टाइल्स आणि पाइपची कन्सिल जोडणी आदी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. अशा सोयी-सुविधा इंटरसिटीच्या दहा आयसीएफ रेकना देण्यात येणार आहेत.
नवीन वर्षांच्या सुरूवातीलाच 15 जानेवारीपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील पहिल्या गाडीचे नूतनीकरण पूर्ण होईल तर दुसऱया गाडीचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल अशी योजना आहे. त्यात डेक्कन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसचा ‘उत्कृष्ट’ योजनेत समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खालील गाडय़ांनाही रंगरंगोटी
डेक्कन एक्स्प्रेस सीएसएमटी -पुणे
इंद्रायणी एक्स्प्रेस सीएसएमटी -पुणे
सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूर-सीएसएमटी
सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूर-सीएसएमटी
अमरावती एक्स्प्रेस अमरावती-सीएसएमटी



























































