गाडीतून ऊस काढण्याच्या नादात लातुरमध्ये एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर 

अहमदपूर शहरातील शिवाजी चौकात लातूर – नांदेड या महामार्गावर ट्रक खाली सापडून जावेद बाबूमियाँ तांबोळी या व्यक्तीचा मृत्यु झाला. शहरातून जाणार्‍या लातूर नांदेड या महामार्गावरील बसस्थानकासमोर शिवाजी चौकात अपघात झाला.

या रहदारीच्या ठिकाणी वर्दळ असते या महामार्गावर एक ट्रक चौकातील वाहतूक कोंडीमूळे थांबला होता. त्यातील ऊस काढण्यासाठी जावेद बाबुमियाँ तांबोळी  हा इसम ट्रकवर चढला. तो ऊस काढत असतानाच वाट मिळाल्याने सदर ट्रक अचानक पुढे निघाला. दरम्यान तांबोळी याचा तोल जाऊन तो ट्रकवरून खाली पडला. गाडीच्या मागच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून हे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर ट्रक चालक सिध्देश्वर जाधव हा ट्रकसह ठाण्यात हजर झाला असून मृत तांबोळी याला अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सांगवीकर करत आहेत.