शौचालय झाले मदिरालय, चंद्रपुरात दारूबंदीची ऐशीतैशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन तीन वर्षे झाली. मात्र, दारू काही केल्या बंद होताना दिसत नाही. आता तर कारवाईच्या भीतीनं लोक सार्वजनिक शौचालयांमध्ये जाऊन मद्यप्राशन करीत असल्याचं दिसून आलं. मद्यपींसाठी शौचालय म्हणजे मदिरालय झालं आहे.

चंद्रपूर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या या स्वच्छतागृहात सर्वत्र मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. नगिनाबाग प्रभागातील या सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांचा हा प्रभाग असून त्यांच्याच प्रभागात दारुबंदीची ऐशीतैशी केल्याचे दिसत आहे. एकीकडे दारुबंदी यशस्वी झाली म्हणून बोंबा ठोकायच्या आणि दुसरीकडे हे चित्र दिसत असल्याने दारुबंदी किती यशस्वी झाली असा प्रश्न पडतो.

स्वच्छतागृहांचा वापर दारुडे मद्यप्राशनासाठी करू लागले आहेत. सायंकाळ झाली की, इथं दारुड्यांची गर्दी होते. दारु पिताना दिसणं किंवा बाळगणं हा गुन्हा असल्यानं दारुड्यांनी या सार्वजनिक ठिकाणाचा बार केलाय. या प्रकाराची तक्रार इथल्या लोकांनी यापूर्वी केली. मात्र, महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केलं.

या गंभीर प्रकाराची दखल वेळीच घेऊन पोलिसात तक्रार करणं हे महापालिकेचं काम होतं. पण त्याकडे डोळेझाक करण्यात आली. आता माध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यावर कारवाईची आणि स्वच्छतेची हमी दिली जात आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात दारुचा ओघ कायम आहे. मागील महिन्यात एका पोलिस अधिकार्‍याची हत्या झाल्यानंतरही पोलिस यंत्रणा पाहिजे तशी काम करीत नाही, हा त्याचा पुरावा आहे.