आमदार विनायक मेटेंचे बंड स्टंट ठरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

आमदार विनायक मेटे आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बंडाचे निशाण फडकणार असल्याचे बोलले जाते. या बंडाने जिल्हा परिषदेतील सत्तेला मात्र फारसा हादरा बसेल अशी शक्यता कमीच आहे. कारण जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी यापूर्वीच मेटेंना सोडले आहे. शिवाय पंचायत समिती भाजपाच्या पाठींब्यावरच उभी आहे. त्यामुळे मेटेंचे हे बंड केवळ फार्स ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

अस्वस्थ असलेले आमदार विनायक मेटे बीडच्या जिल्हा परिषदेत भाजपाला दिलेला पाठींबा काढणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून बीडमध्ये सुरू आहे. आमदार मेटेंच्या या धमकीला भाजपाने विशेषतः पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी फार गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. मेंटेच्या या धमकीचे कोणतेच पडसाद भाजपामध्ये उमटलेले नाहीत याला कारणही तसेच आहे. आमदार मेटे यांच्याकडे जिल्हापरिषदेत चार सदस्य आहेत. त्यातील विद्यमान उपाध्यक्ष जयश्री राजेंद्र मस्के यांनी या पूर्वीच मेटे यांना सोडले आहे. त्या सध्या पंकजा मुंडे सोबत आहेत. उर्वरित तिघांपैकी किती सदस्य अखेरच्या क्षणी मेटेंचा आदेश मानतील हे महत्वाचे ठरणार आहे. जिल्हापरिषदेत आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, आमची कामे होत नाही, ही खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली होती. मात्र भाजपा, शिवसेनेच्या पाठींब्यावर मेटे यांच्या ताब्यात असणाऱ्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या बीड पंचायत समिती मध्ये मेटे आपल्या सहयोगी मित्रांना विश्वासात घेतात का? हा सवाल उपस्थित होत आहे. बीड पंचायत समितीचे अक्षरशः वाटोळे झाले. ही पंचायत समिती फ्लॉप कोणा मुळे ठरली. प्रत्येक कामात कोणाचा हस्तक्षेप असतो. पंचायत समितीचे तीन तेरा का वाजले आहेत. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभाच्या 832 अनुदान विहिरी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. बांधबंदीस्तीची कामे ठप्प आहेत. रोहयोची कामे बंद आहेत. पंचायत समितीला जिल्हा परिषदेने वर्ग केलेला 3 कोटी 90 लाख रुपयांचा निधी कामे वेळेत न झाल्याने परत गेला याचे खापर कोणावर फुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे. आमदार विनायक मेटे यांनी जिल्हापरिषदेतील आपला पाठींबा काढून घेतल्यावर पंचायत समितीमधील भाजपा आपला पाठींबा कायम ठेवेल का की काढून घेईल, या जर तरच्या गोष्टींमुळे मेटे यांची केवळ स्टंटबाजी ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.