
>>प्र. कृष्णकुमार गावंड
आज ‘सारेगमप’ सारख्या माध्यमातून आर्या, रोहित, प्रथमेश, मुग्धा, कार्तिकीसारख्या बालकलाकारांचा उदय झाला. आज या सर्व लिटल चॅम्प्सनी आपल्या तारुण्यात प्रवेश केला असून आपला आवाज अधिक परिपक्व करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट! अर्थात याचे श्रेय आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला द्यायला हवे. त्यामुळे या कलाकारांना एक मंच (प्लॅटफॉर्म) मिळाला. यावेळी मला आठवतो साधारण 30 वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा असे रिअॅलिटी शो नव्हते, जीवघेणी स्पर्धाही नव्हती, पण एखाद्या लाईव्ह कार्यक्रमातून हरहुन्नरी कलाकार आपली चुणूक दाखवायचा. असंच घडलं 1990 साली.
मराठी चित्रपट संगीताचा प्रवास दाखविणारा एक कार्यक्रम ‘स्मरणयात्रा’ जागतिक मराठी परिषदेने नेहरू सेंटर येथे आयोजित केला होता. त्यामध्ये ‘राजा हरिश्चंद्र’पासून ‘शापित’पर्यंत चित्रपट संगीताचे अनेक टप्पे प्रत्यक्ष गाणी सादर करून तसेच दृकश्राव्य माध्यमाद्वारे मनोरंजक पद्धतीने पेश केले होते. या कार्यक्रमात बुजुर्ग गायक, निवेदकांबरोबर काही उभरते गायक रसिकांच्या हृदयात एक वेगळाच ठसा उमटवून गेले. त्यातल्या एका ‘मृदुल’ आवाजाने वेगळीच छाप पाडली. तो सात्त्विक, मधूर आवाज होता आज संगीत क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱया मृदुला दाढे – जोशी यांचा! या सुरील्या गायिकेने लिहिलेले ‘रहे ना रहे हम’ हे पुस्तक नुकतच प्रकाशित झालं.
हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणाऱ्या अनेक संगीतकारांपैकी 12 संगीतकारांच्या कारकीर्दीचा परामर्ष घेणारे पुस्तक रोहन प्रकाशनने रसिकांसमोर आणले आहे. When Melody was Queen असं एकेकाळच्या हिंदी चित्रसृष्टीचं वर्णन करता येईल. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ त्यातील आशयघन, सुरेल, सुमधूर आणि भावनाप्रधान गीतांनी अजरामर केला. जुन्या पिढीतल्या, मधल्या पिढीतल्या आणि आजच्या तरुण पिढीलाही भूल पाडणारं, आकर्षून घेणारं हे संगीत. ही गीतं चिरतरुण का ठरली याचं मर्म उलगडून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने या पुस्तकात केला आहे.
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यामध्ये प्रत्येक संगीतकाराच्या चित्रपटाची यादी नसून त्याच्या शैलीचा परिपूर्ण अनुभव वाचकास सहज मिळू शकतो. प्रत्येक संगीतकाराचे बारकावे लेखिकेने अचूकपणे टिपले आहेत आणि ते मोठय़ा मार्मिक शब्दांत मांडले आहेत. नुकतीच ज्यांची जन्मशताब्दी साजरी झाली त्यात सी. रामचंद्र यांच्याबद्दल डॉ. मृदुला लिहिते,
‘‘एखाद्या मस्तीखोर मुलाला दरडावून गंभीर व्हायचं सांगितल्यावर त्याने तेवढय़ाच गंभीरपणे खूप छान बोलावं आणि चक्क विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणारा वगैरे एखादा सिद्धांत मांडावा, अगदी तसंच ‘आजा मेरी जान’ किंवा ‘हम तो जानी प्यार करेगा’चा दंगा करून झाल्यावर ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ किंवा ‘कटते है दुख में ये दिन’, ‘ये जिंदगी उसीकी है’सारखी अप्रतिम पॅथॉजची गाणीही तेवढय़ा ताकदीने बनवावीत ती अशा कलंदरानेच! ‘शास्त्र्ा आणि कला’ हा झगडा ज्यांच्या गाण्यात संपतो ते म्हणजे ‘अण्णासाहेब चितळकर’ म्हणजे सी. रामचंद्र.’’
संगीतकार सलिल चौधरींबद्दलदेखील लेखिका भन्नाट लिहिते, ‘‘सलिलदांच्या संगीताच्या राज्यात त्यांचं बोट धरून निघावं लागतं. कितीही पंडित असलात, विद्वान असलात तरी तुमचं तारू भरकटायला वेळ लागणार नाही. कारण त्यांच्या रचनांना कुठलंच बंधन नाही, पण त्या ‘स्वैर’ नाहीत. सलिलदांच्या दुनियेत फक्त आनंदच आहे.’’
चित्रपटसृष्टीत 22 वर्षे सातत्य टिकवून ठेवणाऱ्या शंकर-जयकिशन यांचं वर्णन मोजक्याच शब्दांत लेखिका किती सहजपणे करते – ‘‘हिंदी चित्रपट शब्दालाच एक पर्याय, एक अर्थ, एक आयाम प्राप्त करून देणारे ‘कला आणि व्यवसाय’ यांचा अद्भुत मिलाप साधू शकणारे, संगीतकारांना ग्लॅमर म्हणजे काय, स्टारडम म्हणजे काय हे दाखवून देणारे संगीतकार म्हणजे शंकर-जयकिशन!’’
या सर्व लेखांचे यश एका विशिष्ट गोष्टीमध्ये लपलेले आहे ते म्हणजे मृदुला स्वतः प्रतिभावान गायिका आहे. लहानपणापासून मृदुला व तिचे आईवडील आणि चित्रपट संगीत एकाच धाग्यात गुंतले. त्यानंतर मृदुलावर शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले व आज तिने ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात पीएचडी केली आहे. तिचे क्षेत्र केवळ संगीतापुरते मर्यादित राहिले नसून ती चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रमही करत असते. या अनुभवांमुळे ‘चित्रपट संगीतातील Orchestration (वाद्यमेळ)’ या विषयावर तिने अधिकाराने या पुस्तकात लिहिले आहे.
आदरणीय डॉ. अशोक रानडे म्हणायचे, ‘‘जे कलाकार गातात, मैफली करतात ते लिहीत नाहीत आणि जे लिहितात, बोलतात ते गात नाहीत.’’ या वाक्याला मृदुला ही अपवाद आहे हे तिने ‘रहे ना रहे हम’ या पुस्तकात अतिशय समर्थपणे सिद्ध केले आहे.
रहें ना रहें हम
लेखिका : मृदुला दाढे-जोशी
प्रकाशन : रोहन प्रकाशन
मूल्य : 300 रुपये, पृष्ठ : 254
























































