
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
येत्या पंधरा दिवसात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून वाळू उत्खनन परवाने दिले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी लेखी आश्वसन दिल्यानंतर कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने गेले चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन आज मागे घेतले.
जिल्ह्य़ातील सर्वच ठिकाणामधील खाडीपात्रातील वाळू लिलाव प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली नाही. परिणामी जिल्ह्यातील मजूर, चालक, मालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे रखडलेली ही वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ सुरू करा या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने बुधवार (१२ डिसेंबर) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनसाठी शेकडो डंपर जिल्हाधिकारी कार्यालयासह सिंधुदुर्गनगरी परिसरात उभे करून ठेवल्यात आले होते. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध घोषणाही दिल्या जात होत्या. दरम्यान आज चौथ्या दिवशी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाळू उत्खनन बाबत अहवाल प्राप्त झाला असून त्यांनी येत्या पंधरा दिवसात आवश्यकती कारवाही पूर्ण करून हातपाटी वाळू उत्खनन परवाने दिले जाणार असल्याचे लेखी आश्वासन या डंपर चालक मालक संघटनेला आज दिले त्यामुळे हे आपण गेले चार दिवस सुरु केलेले आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती कुडाळ डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट यांनी दिली.
आज चौथ्या दिवशी डंपर आंदोलन मागे घेत डंपर आपल्या घरी निघाल्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सूटकेचा निश्वास सोडला.
आता पावसाळ्यातही सुरु राहणार वाळू उत्खनन
मेरीटाइम बोर्डाने दिलेल्या अहवाला नुसार आता पावसाळ्यातही वाळू उत्खनन करता येणार आहे. यापूर्वी ३० में पर्यंत वाळू उत्खनन परवाने दिले जात होते. मात्र आता ३० सप्टेंबर पर्यन्त हातपाटी पध्दतीने वाळू उत्खनन करता येणार आहे. त्यासाठी काही अटीही शासनाने घालून दिल्या असल्याची माहिती कुडाळ डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्वांच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लागला
आपल्या डंपर आंदोलनाकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्लक्ष केला असता तरी आपला वाळू उत्खननाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी बंदर विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संग्राम प्रभुगावकर, नीलेश राणे, धीरज परब, आनंद शिरवंडकर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचेही डंपर चालक मालकांनी सांगितले.
































































