
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या सर्व दावेदारांसोबतचे आपले छायाचित्र ‘ट्विटर’वर आज जारी केले खरे. पण त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पेच मात्र अद्याप सुटलेला नाही.
दरम्यान, छत्तीसगडमधील पक्षाचे नेते पी. एल. पुनिया यांनी आज रविवारी दुपारी 12 वाजता रायपूर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून त्यात मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होईल, असे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण?
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी टी. एस. सिंहदेव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल, चरणदास महंत या चार काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राहुल गांधी यांनी त्या चौघा दावेदारांसोबत आतापर्यंत तीन बैठका केल्या आहेत.
गेहलोत यांचा शपथविधी उद्या
राजस्थानातील काँग्रेसचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा शपथविधी सोहळा सोमवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे. त्या समारंभाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ाला विरोधी पक्षांतील शरद पवार, शरद यादव, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, मायावती, अरविंद केजरीवाल आदी नेतेही उपस्थित राहतील. ही माहिती खुद्द गेहलोत यांनीच आज काँग्रेस आमदारांच्या एका बैठकीत दिली. गेहलोत हे राजस्थानात तिसऱयांदा मुख्यमंत्री होणारे चौथे राजकीय नेते आहेत.
सोमवारी शपथविधी
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची आजच्या बैठकीत निवड झाल्यानंतर सोमवारी रायपूर येथील सायन्स कॉलेजच्या मैदानात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती पुनिया यांनी दिली.



























































