कोस्टल रोड हे मुंबईकरांचे स्वप्न, ‘महासेतू’ चार वर्षांत पूर्ण होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकर आपलं रोजचं आयुष्य कोण घडवणार याचं उत्तर शिवसेना म्हणून देत असेल तर अशा मुंबईकरांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. हा कोस्टल रोड हे केवळ माझं स्वप्न नव्हे तर तमाम मुंबईकरांचे स्वप्न आहे. या सागरी महामार्गाच्या भूमिपूजनाने शिवसेनेच्या कर्तव्यपूर्तीची सुरुवात आता झाली आहे. येत्या चार वर्षांत तो पूर्ण होऊन स्वप्नपूर्ती होईल तेव्हा शिवसेनाच याचे उद्घाटन करील, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कंबाला हिल येथील अमरसन्स उद्यानाजवळ पार पडलेल्या या शानदार सोहळय़ाला शिवसेना नेते, युवासेना प्रमख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईसाठी काही तरी करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुखांनाही आज धन्य वाटलं असेल की, माझी शिवसेना जनसेवेचे हे कार्य पुढे नेत आहे. मुंबईतल्या सी-लिंकचं भूमिपूजन शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झालं होतं. आज त्याच्या पुढचा टप्पा शिवसेनेच्याच हस्ते होतोय. विशेष म्हणजे हा मार्ग टोल फ्री असणार आहे असे सांगताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.

स्वप्नं अनेक जण दाखवतात, पण स्वप्न पूर्ण करणारी टीम नसेल तर स्वप्नं हवेत विरून जातात. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात कोस्टल रोडचं वचन दिलं. हे वचन अभ्यासाने पूर्ण करण्याचं काम प्रशासकीय टीम करीत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह अधिकाऱयांचे कौतुक केले.

वेळेच्या आधी प्रकल्प पूर्ण होईल
नरीमन पॉइंट ते गोराईपर्यंतचं आपलं स्वप्न होतं. ठीक आहे, वरळी ते वांद्रय़ापर्यंतचं काम महापालिकेला दिलं आहे. वांद्रय़ाच्या पुढचं काम सरकार करतेय. ठीक आहे, आम्हीसुद्धा थोडे थोडे आहोत तिकडे. तोसुद्धा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी खात्री बाळगतो. कर्तव्यपूर्तीची सुरुवात आता झाली आहे. पूर्ण झाल्यानंतर स्वप्नपूर्ती होईल. पण शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे ‘करून दाखवलं’ त्याची सुरुवात आज करतोय. वेळेच्या आधी हा प्रकल्प पूर्ण होवो. मुंबईकरांना आपल्या कुटुंबासह येथील मोकळी मैदाने, सायकल ट्रक याचा आनंद घेता येवो. माझी मुंबई, माझ्या मुंबईची माझी महापालिका हे काम करू शकते याचा आनंद मुंबईकरांना लवकरात लवकर मिळो, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुंबईकरांच्या ऋणातच राहू इच्छितो
या वेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवसेनेला 52 वर्षं झाली. मधली काही वर्षं सोडली तर मुंबईकरांनी 30-35 वर्षे शिवसेनेला अमाप प्रेम दिलं आहे. माझ्या स्वप्नांना, पंखांना बळ देण्याचं काम मुंबईकरांनी केलं नसतं तर आजचा दिवस उजाडला नसता. ज्या गतीने मुंबई पसरतेय, वाढतेय त्या सगळ्या पसाऱयात मुंबईकर एका पक्षाला आपलं मानतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देतात. संपूर्ण मुंबईकर आपलं रोजचं आयुष्य कोण घडवणार याचं उत्तर शिवसेना म्हणून देत असेल, अशा मुंबईकरांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. मी या मुंबईकरांच्या ऋणातच राहू इच्छितो!

जगात जे सर्वोत्तम ते मुंबईत हवं!
मुंबईकरांना अभिमान वाटला पाहिजे की, माझ्या मुंबईचं काम हे जागतिक दर्जाचं होतंय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मुंबई महापालिका कुठेही कमी पडत नाही. जगात जे सर्वोत्तम आहे ते माझ्या मुंबईला पाहिजेच हा माझा हट्ट आहे, आग्रह आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई पुन्हा धावायला लागेल
कोस्टल रोडच्या माध्यमातून मोकळे भूखंड तयार होणार आहेत. नाहीतरी भूखंड आहेत कुठे? आपण म्हणतो, मुंबई धावत असते. पण धावायला जागा आहेच कुठे! एवढं ट्रफिक जॅम होतंय की मुंबईही अडखळायला लागली आहे. त्यात स्पीड ब्रेकर, सिग्नल, बंपर टू बंपर ट्रफिक. धावती मुंबई थांबून जातेय. हा मार्ग झाल्यानंतर मुंबई पुन्हा धावायला लागेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करा
500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्याचं वचन शिवसेनेनं दिलं आहे. ते मी पूर्ण करून दाखवणारच. ते केल्याशिवाय सोडत नाही. पण महापालिकेने तो ठराव करून पाठवलाय. आता तो ठराव सरकारच्या दफ्तरी पडला आहे. सरकारने जशा या प्रकल्पाला परवानग्या दिल्या तशाच त्यालाही परवानग्या द्या, असे ही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

आम्ही कोत्या मनाचे नाही; राज्य सरकार, केंद्र सरकारलाही धन्यवाद देतो!
आम्ही कोत्या मनाचे नाहीत. मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही धन्यवाद द्यायचे आहेत. सरकारने मुंबईकरांच्या स्वप्नांच्या आड न येता, दुजाभाव न करता ज्या परवानग्या दिल्या त्यासाठी खास धन्यवाद देतो. पण हे धन्यवाद देत असताना जशी या महामार्गाला परवानगी दिली तसे अनेक प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे दफ्तरी पडून आहेत. त्यालाही लवकरात लवकर अशाच परवानग्या द्या, हीसुद्धा विनंती या सर्व मुंबईकरांच्या वतीने तुम्हाला करत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईकडून लोखो कोटी नेता, मग काही दिल्याची टिमकी वाजवू नका!
दरवर्षी केंद्र सरकार लाखो कोटी रुपये मुंबईतून कराच्या रूपाने नेते. त्याबदल्यात मुंबईला काय देता. मुंबईची ताकद मोठी आहे. ती ताकद मला आणखी वाढवायची आहे. आणखी बळकट करायची आहे. ती हिंमत शिवसेना आणि मुंबईकरांत आहे. लाखो कोटी रुपये घेऊन जात असताना आम्ही मुंबईला दिलं की नाही, टिमकी वाजवू नका. मुंबई तुम्हाला देतेय. तुम्ही मुंबईला काही देत नाही. मुंबई स्वतःच्या हिमतीवर हे करतेय. जसा हा प्रकल्प दिलाय तसा पूर्व किनाऱयाचा प्रकल्पही पूर्ण करेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

यावेळी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव, साधना माने, अरुंधती दुधवडकर, सरिता पाटील, राजुल पटेल, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी, संजय सेठी आदी उपस्थित होते.

मुंबईतच नव्हे तर परदेशातही मुंबई महापालिकेची पारदर्शकता दिसली
‘पारदर्शक’तेच्या मुद्दय़ावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महापालिकेने खऱया पारदर्शकतेने या कोस्टल रोडसाठी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन बिड काढली. समजा जर का आपल्या देशात कुणाच्या नजरेतून सुटलं असेल तर परदेशात गेल्यानंतर निश्चितच त्यानं ते पाहिलं असणार (हशा). परदेशात कुठे ना कुठे गेल्यावर बघण्याचा योग आलाच असणार. मुंबई महापालिकेची पारदर्शकता कशी असते ते सगळ्यांना यानिमित्ताने कळले. केवळ मुंबईत नव्हे, राज्यात, देशात, परदेशात… जिथे बघायचंय तिथे बघा आमची पारदर्शकता, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

केंद्राला जमत नसेल तर महापालिका पूर्व किनाऱयाचा विकास करेल!
मुंबईला दोन सागरी किनारे आहेत; पूर्व आणि पश्चिम. पश्चिम किनाऱ्यावर हा महामार्ग होत आहे. पूर्व किनारपट्टीवर मुंबईची 900 एकर जागा वापराविना पडून आहे. यातील काही जागा माझगाव डॉक, नेव्हीकडे आहे. पण तिचा वापर नाही. तिथे काय होतंय तर अतिक्रमण, जंकयार्ड, कशाला हवंय घेऊन जा ना तुम्ही ते, असे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावले. ते पुढे म्हणाले, शिवसेनेने वचनानाम्यात सांगितलंय, त्या पूर्व किनारपट्टीवर मुंबईकरांसाठी मोकळ्या जागा निर्माण करू. ओशन पार्क करू. जशी तुम्ही कोस्टल रोडसाठी परवानगी दिली, तशी पूर्व किनाऱयाच्या विकासाला परवानगी द्या. जर महापालिकेला हे काम द्यायचं नसेल तर तुम्ही केंद्र सरकारने विकास करावा. पण त्याचा विकास करताना भाकड स्वप्न दाखवू नका. गरीबांना घर… जिथे गरीब जातच नाहीत़ घरं बांधणारे बांधून मोकळे होतात, विकणारे विकून मोकळे होतात आणि जागा मात्र माझ्या मुंबईची जाते. अशी स्वप्ने दाखवू नका. विकास करा पण तिथे मोकळ्या जागा हव्यात, म्युझियम असेल, ओशन पार्क असेल… तुम्ही नसाल विकास करीत तर माझी मुंबई महापालिका समर्थ आहे. ती आपल्या पायावर, आपल्या ताकदीवर आणि तमाम मुंबईकरांच्या आशीर्वादाने या कोस्टल रोडप्रमाणेच पूर्व किनाऱयाचाही विकास करेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

भूमिपुत्रांना भकास करून विकास नाही!
कोळी बांधवांच्या मनातील शंकांचेही त्यांनी निरसन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, या महामार्गाविषयी काही जणांच्या मनात शंका आहे. कोळी बांधवांच्या मनात शंका आहेत. पण चिंता नको, काहीही होणार नाही. तुमचं जे काही आहे त्याला धक्काच काय साधा चराही जाऊ देणार नाही, त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे म्हणून मी घेतली आहे. जर आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या सुविधा देत असू तर शिवसेनेची भूमिका हीच आहे की, माझा स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला भकास करून विकास होऊ देणार नाही. ही खबरदारी शिवसेनेने घेतेलेली आहे. ज्या कुणाला शंका आहे त्यांना मंगळवारी बोलावलेलं आहे. त्या सगळ्यांचं शंकानिरसन केलं जाईल. त्यांनाही अभिमान वाटेल की हे शिवसेनेनं केलेलं काम आहे.