
सामना प्रतिनिधी, धुळे
तुळशी विवाहानंतर सर्वत्र होत असलेले विवाह, दत्तजयंती, नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी होत असलेल्या कार्यक्रमांना फुलांची मागणी होत आहे. शहरात अन्य जिल्हय़ांतून आकर्षक फुले दाखल होत आहेत. फुले विक्रेत्यांनी त्यांच्यातील कसब पणाला लावत आकर्षक पुष्पगुच्छांची निर्मिती आरंभली आहे. मागणी वाढल्यामुळे पुष्पगुच्छ आणि पुष्पहारांच्या किमती वाढल्या आहेत.
सर्वत्र लग्नसराई सुरू झाली आहे. मुहूर्त साधत ठिकठिकाणच्या मंगल कार्यालयांमध्ये सनईचे सूर वाजवित शुभमंगल पार पडत आहेत. त्याचवेळी दत्तजयंती, नाताळ, नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने निरनिराळय़ा व्यक्ती आणि संस्थांकडून कार्यक्रम घेतले जात आहेत. अलीकडच्या काळात कार्यक्रम लहान असो की मोठा त्यात पुष्पगुच्छ हवाच अशी धारणा झाली आहे. निरनिराळय़ा आकर्षक पानाफुलांच्या आधारे फुल विक्रेते पुष्पगुच्छ तयार करतात. आकर्षक पुष्पगुच्छांची मागणीही वाढली आहे.
अनेक कार्यक्रमांना कार्पेरेट लूक आल्याने तेथे पुष्पगुच्छ देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याची रीत निर्माण झाली आहे. मंगल कार्यासाठी तर फुले हवीतच. फुलांची तोरणे उभारली जातात. विवाह मंडप सजविण्यासाठी फुलांचा वापर होतो. सध्या धुळे शहरासह शेजारच्या नाशिक, नगर जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात फुले आणली जात आहेत. त्यात प्रामुख्याने गुलाब, जरबेरा, निशिगंध आणि मोगऱयाच्या फुलांची मागणी वाढली आहे. लग्न समारंभात साजशृंगार करणाऱया महिलांकडून मोगऱयाच्या फुलांची आवर्जून मागणी होते. पुष्पगुच्छ आणि पुष्पहाराची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या पानाफुलांमुळे शहरातील फुलवाला चौक, संतोषी माता मंदिर चौक सुगंधाने दरवळला आहे.




























































