
सामना प्रतिनिधी, अलिबाग
औषधे बनवण्यासाठी खवले मांजराच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असून एका खवले मांजराला तब्बल 40 लाखांचा भाव मिळत आहे. त्यामुळे हिंदुस्थानात खवले मांजरांची तस्करी मोठय़ा प्रमाणात होत असून रायगडातही तस्करांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र सौदा पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी तस्करी करणाऱया पाच जणांच्या टोळीला दोन खवले मांजरांसह जेरबंद केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन खवले मांजरांची किंमत सुमारे 80 लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
वाळवटी खेडी येथे अतिशय दुर्मिळ असणाऱया दोन खवल्या जातीच्या मांजरांची अवैधपणे विक्री करण्यासाठी तस्कर येणार अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल वलसंग व पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. शनिवारी तालुक्यातील श्रीवर्धन शेखाडी रस्त्यावरील मौजे वाळवटी- खेडी येथील नजफ आराई यांचे दानियल फार्म हाऊसवर विक्रीसाठी दोन खवले मांजरे ठेवण्यात आले असल्याचे समजताच पथकाने छापा टाकला. यावेळी दोन खवले मांजरांना ताब्यात घेऊन फैजल काळोख (42), नीलेश कर्नेकर (32), , अशोक दर्गे (55), हेमंत गुरव (46), किशोर मोहिते (43) या पाच आरोपींना अटक करण्यात आली.
रायगडात तस्करांचा अड्डा
रायगड जिह्यातील दऱयाखोऱयांमध्ये मोठय़ा प्रमाणात जंगल पसरले असून विविध प्रकारची वन्यजीवांची संपदा लाभली आहे. याचा फायदा घेत येथे तस्करांनी अड्डा केल्याचे गेल्या काही महिन्यांच्या कारवाईवरून समोर येत आहे. पेणमध्ये गेल्या दोन महिन्यांत मांडूळ सापासह, खवले मांजर, वाघ नखांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर श्रीवर्धनमध्येही लाखमोलांचे खवले मांजरांची तस्करी उघडकीस आल्याने येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






























































