पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

तीन राज्यांतील पराभवाचा धक्का व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सार्वजनिक प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन व कल्याणला सिडकोच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबर रोजी मुंबई व कल्याणमध्ये येत आहेत. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील.

मोदी यांचे सकाळी दहा वाजता हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून हेलिकॉप्टरने कुलाबा येथील आयएनएस शिक्रा या नौदलाच्या तळावर उतरतील. साडेअकराला राजभवनवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते ‘टाइमलेस लक्ष्मण’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमानंतर कल्याणच्या फडके मैदानात मोदींच्या हस्ते मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. कल्याणच्या कार्यक्रमानंतर पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित सोहळ्यात मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन होईल. त्यानंतर नरेंद्र मोदी हे पुणे विमानतळावरून नवी दिल्लीकडे रवाना होतील.