
सामना ऑनलाईन, मुंबई
जीवनदान देणाऱ्या, आजारी व्यक्तींना बरे करणाऱ्या अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला आग लागली आणि या आगीच्या धुराने अनेकांचे प्राण घेतले. आगीपेक्षा धुराचे रूप इतके अक्राळविक्राळ होते की, तेच अनेकांसाठी जीवघेणे ठरले. जिथे जीव वाचतो तिथूनच आत अडकलेले लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले.
एमआयडीसीसमोरच हे पाच मजली साडेतीनशे बेडचे रुग्णालय असून तळमजल्यावर अपघात विभाग, पहिल्या मजल्यावर ओपीडी, दुसऱ्या मजल्यावर स्त्रीरोग विभाग तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शस्त्रक्रिया व अतिदक्षता विभाग आहे. दुपारी चारच्या सुमारास शस्त्रक्रिया विभागात अचानक आग लागली आणि धुराचे लोट उठले. सगळीकडे एकच पळापळ झाली. धुराचा हा लोट एवढा गडद होता की, समोरचे काही दिसणे सोडा, पण श्वास घेणेही मुश्किल झाले होते. मग सुरू झाला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा, डय़ुटीवरील कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्याचा आकांत. गॅलरीच्या खिडक्या उघडून काहींनी मदतीचा धावा सुरू केला. आगीपेक्षा त्या काळय़ा धुराचेच रूप अक्राळविक्राळ आणि जीवघेणे होते. काहींनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडीही मारली. सर्व मजल्यांवर अशी जीवघेणी पळापळ सुरू होती.
अग्निशमन दलाची शर्थ
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या 10 फायर इंजिन, 6 जम्बो ट्रंकर, 108 क्रमांकाच्या 15 रुग्णवाहिका, 2 क्यूआरव्ही, 2 ब्रिदिंग ऍपरॅटस, 3 टीटीएल, 1 एलपी, 1 रेस्क्यू व्हॅन, 1 सीपी असा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. संध्याकाळी 7 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आहे. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन सुरू झाले.
हॉस्पिटलची अग्निरोधक यंत्रणा कुचकामी
या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याची माहिती या आगीनंतर पुढे आली आहे. गेल्याच महिन्यात नोव्हेंबर 2018 मध्ये या हॉस्पिटलकडे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने ही माहिती अद्याप दिलेली नसल्याचे आपत्कालीन विभागाचे म्हणणे आहे. वारंवार विचारणा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतो आहे. गेल्या दोन वर्षांत हॉस्पिटलमधील स्टाफचे आपत्कालीन नियंत्रण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेले नसल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते.
मुख्यमंत्र्यांच्या ‘फायर ऑडिट’चे काय झाले?
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची तसेच मागील दहा वर्षात मुंबईत आगीच्या पन्नास हजार घटनांमध्ये 609 जणांचा मृत्य झाला होता. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोनदा फायर ऑडिट सक्तीचे करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली होती; पण अंधेरी मरोळ कामगार रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते का, असा प्रश्न शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी या आगीच्या निमित्ताने आज उपस्थित केला. वांद्रे पश्चिम येथील लीलावती रुग्णालयाजवळील नर्गिस दत्त नगरमध्ये ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या आगीच्या घटनेवर तसेच परळच्या क्रीस्टल टॉवरला लागेल्या आगीच्या घटनेवर शिवसेनेने विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल होता. त्यावरील लेखी उत्तरात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार मुंबईतील इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक असून वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक असल्याचे उत्तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिले होते, अशी आठवण सुनील शिंदे यांनी यावेळी करून दिली.
शिवसैनिक मदतीला धावले
कामगार रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच शिवसेना आमदार रमेश लटके यांनी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली होती. अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्याआधीच उपशाखाप्रमुख प्रतीक मुळीक आणि उमेश ठाकूर यांच्यासह शिवसैनिकांनी धाव घेत अनेक रुग्णांना खाली आणले.
रबर आणि कापसामुळे धूर
कामगार रुग्णालयाच्या मागील बाजूचे काम गेल्या आठ-नऊ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात बांधकामाचे साहित्य इतस्ततः पसरलेले आहे. तसेच आग लागलेल्या चौथ्या मजल्यावर काळ्या रबराचे बंडल आणि कापूस मोठय़ा प्रमाणात होता. त्याने पेट घेतल्यामुळेच सर्वत्र धुराचे लोट उसळले होते.
मृत्यूचा अंधार
अंधेरी येथील ‘ईएसआयसी’ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांनी अक्षरशः मृत्यूच समोर पाहिला. रुग्णालयातली कॉट मृत्युशय्याच ठरणार या भीतीने रुग्णांचा थरकाप उडाला. काहीजण नुकतीच शस्त्रक्रिया उरकल्याने ग्लानीत होते तर काहींना वयामुळे चालताही येणे शक्य नव्हते. अशाच स्थितीत धुराने वॉर्डचा ताबा घेतला. पूनम कांबळे या मुलीला उलटय़ा-जुलाब जात असल्याने या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या वॉर्डमध्ये तिचे वडील निवृत्ती कांबळे हेही ऍडमिट होते. या दोघांवरील उपचारांत कुटुंबाची अक्षरशः कसरत सुरू होती. आई रमा कांबळे ही पूनमच्या शेजारीच बसली होती. ज्या चौथ्या मजल्यावर आग लागली तिथेच हा वॉर्ड होता. धुराचे लोळ आणि आगीने वॉर्डला वेधले. बाहेर कसे पडायचे हाच प्रश्न होता. कुणीतरी खिडकीच्या काचा फोडल्या. खाली उतरण्यासाठी रस्सी टाकण्यात आली. रस्सीवरून उतरताना पूनमचे हात सोलले गेले. आईचे हात भाजले तर धुराने तिला श्वास घेणेही कठीण झाले. वडील निवृत्ती कांबळे यांचीही हीच स्थिती झाली. या तिघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भागाबाई भीतीने कापताहेत
भागाबाई प्रकाश शिंदे (50) या पोटाच्या विकाराने त्रस्त होत्या. उद्या शस्त्रक्रिया करायची म्हणून आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी मुलगा डबा देऊन काही वेळात येतो असे सांगून गेला. थोडी डुलकी लागली. या डुलकीतून जाग आली ती गोंगाटाने. जो तो सैरावैरा पळत होता. दरवाजातून बाहेर जाणे शक्य वाटले नाही म्हणून भागाबाई खिडकीजवळ पोहचल्या. आग आपल्याला गिळेल यापेक्षा आपणच उडी मारावी अशा विचारात होत्या. तेवढय़ात अग्निशमन दलाची मदत आली, पण शिडी चौथ्या मजल्यापर्यंत पोहचत नव्हती. तिसऱ्या माजल्यापर्यंत रस्सीने खाली उतरून मग अग्निशमन दलाची शिडी लागली. हे सांगताना त्या भीतीने थरथरत होत्या.































































