भयंकर! दिल्लीत 75 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. येथील पहाडगंज भागात एका 75 वर्षीय वृद्धेवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने त्यास विरोध केल्याने आरोपीने तिला बेदम मारहाण केली. यात महिला बेशुद्ध झाल्याने ती मृत झाल्याचे समजून आरोपीने तिथून पळ काढला. पण त्याआधी त्याने घरातून रोकड व दागिने लंपास केले. पीडितेस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. कपिल कुमार असे त्याचे नाव आहे.

पीडिता घरात एकटीच राहत असून डायबिटीस व किडनीच्या विकाराने ग्रस्त आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास कोणीतरी महिलेचा दरवाजा ठोठावला. महिलेने दरवाजा उघडताच तिला चेहरा रुमालाने झाकलेल्या एका व्यक्तीने आत ढकलले. यामुळे ती कॉटवर पडली. त्यानंतर आरोपीने तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला व तो तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करु लागला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीच्या तोंडावरचा रुमाल पडला. तेव्हा तो शेजारी राहणारा तरुण असल्याचे महिलेने ओळखले. ती मदतीसाठी आरडा ओरडा करू लागली. यामुळे नराधमाने तिला बेदम मारहाण केली. यात महिला बेशुद्ध झाली. यामुळे ती मृत झाल्याचे समजून आरोपीने तिच्या घरातील रोकड व दागिने लंपास केले व तिथून पळ काढला. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. नंतर बेशुद्धावस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.