मराठवड्यातील वाळलेल्या ऊसाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी: जयदत्त क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

चालू वर्षाच्या हंगामात मराठवाड्यात संभाजीनगर विभागात 90 लाख टन तर नांदेड विभागात 126 लाख टन ऊस असून यामध्ये केवळ 30 ते 40 टक्के ऊसाचे गाळप होऊ शकते. उभ्या ऊसापैकी 25 ते 30 टक्के ऊसाचे गाळप वेळेत होणार नाही. प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार 73.66 लक्ष टन ऊस गाळपास योग्य असून तीन महिन्याचा कालावधी पाहता वाळलेल्या ऊसाचे पंचनामे करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यात चालू वर्षाच्या हंगामात ऊस उत्पादक अडचणीत सापडला आहे. संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यात 90 लाख टन तर नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यात 126 लाख टन ऊस असून यातील 30 ते 40 टक्के ऊसाचे गाळप होऊ शकते. 13 डिसेंबर 2018 नुसार 10 लाख 12 हजार 150 टन ऊस हा गाळप झालेला असून येत्या तीन महिन्याचा कालावधी पाहता अजून 30 लाख टन ऊस गाळप होऊ शकतो. उर्वरीत ऊसाचा प्रश्‍न आता निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी गाळपाअभावी ऊस वाळू लागला आहे. बीड जिल्ह्यात या वर्षी 49 हजार हेक्टर ऊसाची लागवड झाली असून यातील केवळ 30 ते 35 टक्के ऊसाचे गाळप झाले आहे. पाऊस न पडल्यामुळे उभ्या ऊसाला गेल्या तीन महिन्यापासून पाणी नाही. त्यामुळे ऊसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पाणी बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाळला असून सध्या सुरू असलेली गळप क्षमता पाहता 40 टक्के ऊस गाळपाविना शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. या वाळलेल्या ऊसाचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.