लाट फुटली, गर्दी घटली; रिकाम्या खुर्च्यांपुढे मोदींचे भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-rally-kalyan-chair

सामना प्रतिनिधी । कल्याण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणवासीयांना साडेसहा हजार कोटी पॅकेजच्या नावाखाली आश्वासनांचे गाजर दिल्याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गाजराची तोरणे बांधली. एकीकडे असे स्वागत सुरू असतानाच मोदींची सभा असलेल्या फडके मैदानातही अपेक्षेप्रमाणे गर्दी झालीच नसल्यामुळे शेकडो खुर्च्या ओस पडल्या होत्या. त्यातच मोदींच्या भाषणात कोणतेही स्थानिक मुद्दे नसल्याने भ्रमनिरास झालेल्या कल्याणवासीयांनी सभा सोडून थेट बाहेरचा रस्ता धरला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही लोक थांबत नसल्याने मग मोदींनी भाषण आटोपते घेऊन पुण्याची वाट धरली.

ठाणे-भिवंडी-कल्याण तसेच दहिसर-मीरा रोड या मेट्रो मार्गाचे आणि सिडकोच्या 90 हजार घरांचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून झाले. त्यासाठी भाजपने फडके मैदानावर जंगी सभेचा घाट घातला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांनी काय वाट्टेल ते करा, कुठूनही माणसे आणा, पण फडके मैदान फुल्ल करा असा दमच दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला होता, परंतु इतका गाजावाजा करूनही सभास्थानी अर्ध्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. मोदी भाषणासाठी उभे राहिले तरी या खुर्च्या भरल्या नव्हत्या. पोलीस रस्त्यावर उभ्या असलेल्याना आत मंडपात चला असे सांगत होते. मोदींनी नवे दोन-तीन मुद्दे वगळता काँग्रेसचे सरकार कसे अपयशी होते आणि भाजपचे सरकार कशी विकासकामे करते असे दोन दिवसांपूर्वी रायबरेलीत केलेल्या भाषणाचाच पुन्हा रिप्ले केला.

स्थानिक मुद्दय़ांचा दुष्काळ आणि काळय़ा कपडय़ांचा शोध
27 गाव संघर्ष समिती, संरक्षण दलाकडून नेवाळीवासीयांवर होत असलेला अन्याय आणि समृद्धीबाधित शेतकरी मोदींना काळे झेंडे दाखवणार अशी कुणकुण पोलीस दलाला लागली. त्यामुळे काळे कपडे घातलेल्याना सभाबंदी करण्यात आली होती.

प्लॅस्टिकबंदीचे धिंडवडे
प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी सरकार लाखो रुपये खर्च करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी मात्र प्लॅस्टिकबंदीची साफ ऐशीतैशी केली. पाण्याच्या रिकाम्या आणि प्लॅस्टिकच्या कपांचा सभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अक्षरशः खच पडला होता. भाजपच्या नेत्यांसमोरच कार्यकर्ते प्लॅस्टिकबंदीचे असे धिंडवडे काढत असताना त्यांना कुणीही रोखत नव्हते.

कल्याणवासीयांनी केले उपरोधिक स्वागत
मुख्यमंत्र्यानी कल्याण-डोंबिवलीसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. शिवाय 27 गावांच्या विकासासाठी एक हजार कोटींचे ग्रोथ सेंटर उभारण्याचे जाहीर केले होते. कल्याण-डोंबिवलीवासीयांसाठी लोकल ट्रेनमध्ये मोठी सुधारणा घडवून आणू असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु या घोषणा हवेत विरल्याने याचा निषेध म्हणून कल्याणवासीयांनी रेल्वे स्थानकापासून शहरात ठिकठिकाणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गाजराची तोरणे बांधली.

मोदींनी टिळकांचे जन्मगाव बदलले
छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांची कर्मभूमी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या शहरास मी वंदन करतो, अशी मराठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात आपल्या भाषणाला सुरुवात केली. मात्र मोदींच्या तोंडून ही वाक्यं ऐकताच चौकस पुणेकरांचे कान टवकारले. मोदी मराठीत बोलले म्हणून नव्हे तर, लोकमान्य टिळक आणि गोखले यांची जन्मभूमी पुणे असा उल्लेख मोदी यांनी केल्यामुळे. कारण टिळक आणि गोखले या दोघांचाही जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. त्यामुळे चिकित्सक पुणेकरांनी मोदींना ट्रोल केले.