अॅडलेडवर कमावलं, पर्थमध्ये गमावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पर्थ

अॅडलेड कसोटी जिंकून कसोटी मालिकेची दमदार सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला पर्थ येथील दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान ऑस्ट्रेलियाने या दणदणीत विजयासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर कांगारूंनी मिळवलेला हा पहिलाच विजय ठरलाय हे विशेष. या लढतीत आठ फलंदाज बाद करणाऱ्या नॅथन लायनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

हिंदुस्थानने 5 बाद 112 या धावसंख्येवरून अखेरच्या दिवशी अर्थातच मंगळवारी पुढे खेळायला सुरुवात केली. पण टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. मिचेल स्टार्कने हनुमा विहारीला मार्कस हॅरीसकरवी 28 धावांवर झेलबाद करीत हिंदुस्थानला सहावा धक्का दिला. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत पीटर हॅण्डस्कोम्बकरवी 30 धावांवर झेलबाद झाला. ज्या दोघांवर हिंदुस्थानची मदार होती तेच झटपट बाद झाले. त्यानंतर हिंदुस्थानचा खेळ झटपट खल्लास झाला.

मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स या वेगवान जोडगोळीने टीम इंडियाचा डाव 140 धावांमध्येच संपुष्टात आणला. उमेश यादव (2 धावा), इशांत शर्मा (0) आणि जसप्रीत बुमराह (0) हे बाद झाले आणि हिंदुस्थानचा दुसरा डाव संपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 46 धावा देत 3, नॅथन लायनने 39 धावा देत 3, जोश हेझलवूडने 24 धावा देत 2 आणि पॅट कमिन्सने 25 धावा देत 2 फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्व बाद 326 धावा
  • हिंदुस्थान पहिला डाव – सर्व बाद 283 धावा
  • ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – सर्व बाद 243 धावा
  • हिंदुस्थान दुसरा डाव – सर्व बाद 140 धावा