
सामना प्रतिनिधी । मुंबई
मालाडमधील प्रभाग क्रमांक 32 च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद गोत्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे पद बाद ठरवले असून उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती मंगळवारी उच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळे त्यांचे पद जाण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या गीता भंडारी यांना संधी मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक 32च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला या नगरसेविकेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेली स्थगिती उठवली. स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचा निकाल न्यायमूर्तींनी दिला. गीता किरण भंडारी यांचे वकील वाय. एस. जहागिरदार आणि चिंतामणी भणगोजी यांनी काम पाहिले.
दरम्यान, या निर्णयाबाबत पालिकेच्या संबंधित विभागाकडे अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना नगरसेवक पद मिळण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निकालाची प्रत निवडणूक विभागाला आणि पालिका आयुक्तांना मिळाल्यानंतर किणी यांचे पद बाद झाल्याची रीतसर घोषणा सभागृहात होईल. दुसऱ्या क्रमांकाच्या नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय हा लघुवाद न्यायालयाने घायचा असतो. त्यामुळे भंडारी यांनी आधीच तसा दावा केला असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी दिली. गीता भंडारी या त्यांच्या वहिनी आहेत.
शिवसेना 95..?
गीता भंडारी यांना लवकरच नगरसेवकपद मिळण्याची शक्यता असून त्यामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ एकने वाढून 95 होणार आहे. शिवसेनेचे 85 नगरसेवक असून अधिक 3 अपक्षांचा पाठिंबा आणि नव्याने दाखल झालेले सहा नगरसेवक आणि आता गीता भंडारी असे शिवसेनेचे संख्याबळ 95 होणार आहे.



























































