आभाळमाया : ‘केपलर’ची दीर्घनिद्रा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैश्विक<<

अनेक अवकाशयानांच्या सहाय्याने आपण गेल्या अर्धशतकात विराट विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या ‘विराट’पणापैकी फक्त 4 टक्के विश्व आपल्याला दिसू शकतं. सुमारे 73 टक्के डार्क एनर्जी आणि 23 टक्के ‘डार्क मॅटर’ वगळता जे दिसतं ते आपलं विश्व. त्यातच अब्जावधी तारे, कोटय़वधी दीर्घिका आणि अनेक ग्रह सामावलेले आहेत. आपलीच सूर्यमाला आपल्याला प्रचंड वाटते. अर्थात मानवाच्या अस्तित्वाच्या तुलनेत ती तशीच आहे हे खरंच, परंतु याच माणसाचे डोळे ‘मोठे’ होऊन आता अवघ्या विश्वाच्या पसाऱ्याचा धांडोळा घेत आहेत. आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा प्रगत जीव कुठे आहेत का याचा शोध घेतला जातोय.

त्यासाठी ‘बल’, ‘चंद्रा’, ‘केपलर’ असे विविध लक्ष्मी टेलिस्कोप अवकाशात वेळोवेळी पाठविण्यात आले. पृथ्वीच्या वातावरणाचा अडथळा न येता ‘स्वच्छ’ अवकाशातूनच, विराटाकार विश्वाकडे पाहण्याची संधी या अवकाश-दुर्बिणीना मिळाली आणि त्यांनी त्याचं ‘सोनं’ केलं!

हबल टेलिस्कोपने तर वयाची पंचविशीही पूर्ण केली. एखाद्याच्या ताऱ्याच्या सध्याच्या वस्तुमानावरून त्या ताऱ्याच्या अंतःकाळी त्याचा गाभ्यात किती वस्तुमान शिल्लक असेल यावरून त्याचं व्हाईट ड्वार्क, न्यूट्रॉन स्टार किंवा ‘ब्लॅक-होल’मध्ये कसं रूपांतर होईल याचं अचूक गणित सुब्रमण्यम चंद्रशेखर (सी.व्ही. रामन यांचे पुतणे) यांनी मांडलं. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून ‘चंद्रा’ अवकाश दुर्बिण अंतराळात झेपावली.

या सर्वच दुर्बिणींनी त्यांच्या अपेक्षित कामगिरीपेक्षा खूपच जास्त कौशल्य दाखवून आपल्याला विश्व-परिचय करून दिला. याशिवाय ‘स्पेस स्टेशन’सारख्या ठिकाणी काही काळ वस्ती करून अनेक अंतराळयात्रींनी मोलाची माहिती आणली. इतकं सगळं असलं तरी एकूण विश्वाविषयीच नव्हे तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचीही आपल्याला समग्र माहिती नाही. अजूनही वादळं, भूकंप, बदलतं पाऊसमान याचा अत्यंत अचूक अंदाज आपल्याला वर्तवता येत नाही. इथेच विज्ञानाची कसोटी लागते. विज्ञान समस्या सोडविण्यासाठी असते. त्यासाठीच तर सभोवतीच्या विश्वाचा पसारा आपल्याला खुणावत असतो म्हणूनच वेगवेगळे ‘प्रोब’ (संशोधन यानं) अवकाशात पाठवली जातात.

ज्या ‘केपलर’ यानाचा सुरुवातीला उल्लेख केला ते गेल्या 30 ऑक्टोबरपासून दीर्घ-निद्रेत (हायबरनेशनमध्ये) गेलेलं आहे. हे यान ज्या खगोल संशोधकांच्या नावे अवकाशात सोडण्यात आलं त्याविषयी थोडी माहिती घेऊ. केपलर या शास्त्र्ाज्ञाने ग्रहमालेत फिरणाऱ्या ग्रहांच्या गतीवरून काही नियम बनवले. लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारा ग्रह-सूर्याभोवती परिक्रमा करत असताना तो काही वेळा सूर्याच्या जवळ येतो तर काही वेळा लांब जातो. आपली पृथ्वी सध्या सूर्याच्या जवळ म्हणजे उपसूर्यस्थानावर आहे. जुलैमध्ये ती अपसूर्य म्हणजे सूर्यापासून दूर असते. आता पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे असं घडतं. पृथ्वी जेव्हा सूर्यापासून दूर असते तेव्हा तिचा वेग तुलनेने कमी होतो आणि जवळ असताना वाढतो. मात्र या दोन्ही वेळेस पृथ्वीने पार केलेल्या जागेचे क्षेत्रफळ समानच असते. केपलरच्या या संशोधनामुळे गृहगतीच्या संकल्पनेला बळकटी मिळाली. अशा या संशोधकाला मानवंदना देण्यासाठी ‘नासा’च्या डिस्कव्हरी मोहिमेच्या अंतर्गत ‘केपलर’ दुर्बिण अवकाशात सोडण्यात आली.

2009 मध्ये या दुर्बिणीचं प्रक्षेपण झालं. त्यावेळी सुमारे साडेतीन वर्षे कार्यरत राहू शकेल असं तिचं डिझाइन होतं, परंतु नंतर ते 2012 आणि पुढे 2016 पर्यंत वाढविण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. 2018 च्या जुलैमध्ये केपलर ‘दुर्बिण दीर्घनिद्रेत गेली आणि ऑगस्टमध्ये पुन्हा सुरू झाली. 2015 च्या जानेवारीपर्यंत केपलर दुर्बिणीने आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील 440 ताऱ्याभोवती फिरणाऱ्या 1023 ग्रहांचा शोध घेतला! त्यानंतरच्या संशोधनातून असं लक्षात आलं की, विश्वातील सूर्यासारखा इतर ताऱ्यांभोवती सुमारे 40 अब्ज खडकाळ म्हणजे पृथ्वीसारखे ग्रह फिरत असावेत. ही गणती पुढे वाढतही जाईल. कारण आपल्या एकाच दीर्घिकेत (गॅलॅक्सीमध्ये) दोनशे अब्जांहून अधिक तारे आहेत. त्यातला आपला सूर्य हा सामान्य प्रतीचा, पण आपल्यासाठी ‘जीवनदाता’ तारा आहे.

केपलर 438 बी, 442 बी आणि 452 बी या सूर्यमालिकेपलिकडच्या ग्रहांवर सजीव असण्याची शक्यता आहे, कारण ते त्यांच्या ताऱ्याच्या वसतीयोग्य कक्षेत (हॅबिटेबल झोनमध्ये) फिरत आहेत. इतकी ‘अथक’ मेहनत करून विश्वरूप दर्शन घडविणाऱ्या ‘केपलरला’ मात्र गेल्या ऑक्टोबरमध्ये 30 तारखेला ‘निरोप’ द्यावा लागला कारण त्याच्या चलणवळणासाठी आवश्यक असलेलं इंधनच संपलं. आपल्या 9 वर्षांच्या जीवनकाळात ‘केपलर’ने त्यावरील 55 इंचांच्या परावर्ती आरशाद्वारे आणि 37 इंची श्मिट कॅमेऱ्याच्या सहाय्याने 3,662 परग्रहांचा शोध घेतला. त्यासाठी 530, 506 इतक्या ताऱ्यांचं त्याने निरीक्षण केलं! आता त्याची जागा ‘नासा’च्या ‘टेस’ने घेतली आहे. आपल्या वास्तूचा जसा आपल्याला जिव्हाळा असतो, तसाच संशोधकांना या यानांचा. अवकाशी नेत्र असलेल्या केपलरला निरोप देताना सहाजिकच त्यांचे डोळे पाणावले.