
सामना प्रतिनिधी । खेड
ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 5 व 6 जानेवारी 2019 रोजी मोफत एस एस सी व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचाही सन्मान केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी दिली.
ग्रामीण भागातील एसएससी च्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून परिक्षापूर्व मार्गदर्शन व्हावे या उदात्त हेतूने संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालाचे आयोजन केले जाते. गेली 24 वर्षे ही संस्था अशा प्रकारच्या व्याख्यानमाला आयोजीत करत असून कोकणात व्याख्यानमाला आयोजीत करण्याचे हे चौथे वर्षे आहे. आता पर्यंत अनेक विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा फायदा झालेला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व्याख्यानमालांमधून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे गुणवत्ता यादीत झळकली आहेत.
शनिवार दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता व्याख्यानमाला कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्युक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ श्रीकृष्ण फड, खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, नवी मुंबई येथील चाटर्ड अकाऊटंट ए एम शेट्टी तसेच डॉ राजेश ओतुरकर हे उपस्थित राहणार आहेत.
भरणे नाका येथील श्री गणेश मंगल कार्यालयात होणाऱ्या या व्याख्यानमालांचा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी केले आहे.






























































