प्रतिकूलता+अपयश +प्रचंड मेहनत=यश!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

अभय सदावर्ते… अस्सल अनुवादकार.
डॉ. कलामांच्या पुस्तकाचा अनुवाद अक्षरशः जगले आहेत… कारण प्रतिकूलता आणि अपयश या मिश्रणातून त्यांचे प्रत्येक पुस्तक झळाळून निघाले आहे.
‘आई गरोदर होती. ठाण्याला मुरबाडला राहत होतो आम्ही. गॅलरीत उभी होती ती. अचानक समोरच्या घरातून एक मुलगी खेळता खेळता रस्त्यावर पडली. आईला एवढा जबरदस्त धक्का बसला की, शॉक डिलिव्हरी झाली तिची आणि सातव्या महिन्यातच मी तिच्या पोटातून या जगात उडी मारली. साधारण दोन महिन्यांचा असताना पोलिओ झाला. मुरबाडला डॉक्टर नव्हते तेव्हा. कल्याणला डॉक्टर. वडील सरकारी नोकरीत. आई साधी गृहिणी. तापाची भयानकता समजायला आणि उपचारांना उशीर झाला. त्यामुळे डावा पाय अशक्त झाला. वडील कुठून कुठून तेल आणून मालीश करायचे. आई महालक्ष्मीजवळच्या हॉस्पिटलमध्ये दोन-दोन महिने मला घेऊन जायची. मग माझ्याच लक्षात आलं, आपणच चालायला लागलो तर आपण चालू. नाहीतर गोळा होऊन पडू. मग पडत धडपडत चालायला लागलो. आजीनंही हे मनावर बिंबवलं होतं की, सगळ्यांसारखं जगण्याकरिता तुला अधिक मेहनत घ्यायला हवी. नाशिकचा आमचा तीन मजली वाडा. त्याला सहा जिने. मी नाशिकला गेलो की, ती मला ते मुद्दाम चढा-उतरायला लावायची. पडलो तरी उठून उभा रहा म्हणायची’’ अभय सदावर्ते सांगत होता.

मोठी स्वप्नं पाहणारेच मोठी स्वप्नं सत्यात उतरवतात हे तंतोतंत जगणारा अभय सदावर्ते. बँकेतून लोन घेताना त्यानं मराठीत सही केली तेव्हा ‘‘इंग्रजी सही करणाऱया कोणाला तरी आणा आणि तुम्हाला इंग्रजीत लिहिलेले हे सगळे नियम नीट समजले आहेत असं त्याच्या सहीचं पत्र द्या’’ असंही सांगितलं गेलं. सरकारी नियम इंग्रजी असतात म्हणून मराठीला दुय्यम स्थान? मग हे नियम मराठीत का भाषांतरित होत नाहीत? असं वाटून अस्वस्थता आली. मग मित्रानं टोकलं, ‘‘एवढं मराठी प्रेम आहे, तर एखाद्या इंग्रजी पुस्तकाचा तूच अनुवाद कर बघू.’’ ‘इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी’ पुस्तक त्यानं समोर टाकलं आणि केला अभयनं अनुवाद त्याचा. ‘भारत 2020… नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या अनुवादाची 14वी आवृत्ती निघालीय आता.

‘‘सरकारी आणि कर्मठ घरातला मी. सावरकरांच्या संस्कारांचा घरात प्रभाव. विष्णुसहस्रनाम, अथर्वशीर्षाची नादमयता लहानपणापासूनच परिणाम करत होती. घरात कमालीची शिस्त. व्यक्त होतानाही तोलून-मापून वापरावे लागायचे शब्द. तो नीटनेटकेपणा असा अंगीभूत झालाय की, लिहिताना कागदाची चळतसुद्धा व्यवस्थित लागते मला आज. वडिलांच्या बदलीमुळे आठवीपर्यंत अनेक गावी कुटुंब हललं. पाचोऱयात महादेव मंदिराच्या चार ओवऱयात चार वर्ग भरायचे. गावातल्या बायका दुपारी तिथे गावरान भजन म्हणायच्या. त्यांच्याकडूनच अहिराणी म्हणी ऐकल्या मी.’’

अभयचं कुठलंही पुस्तक उघडलं तरी पुस्तकी भाषेपेक्षा तो वाचकांशी बोलतोय असं वाटण्याचं नादमाधुर्य त्याच्या लेखणीत कुठून अवतरलंय त्याचा संदर्भ मला या त्याच्या बोलण्यानं लागला. अभय सांगत होता, ‘‘पाचोऱयाचं घर दोन खोल्यांचं. उतरत्या छपराचं. मातीचं, शेणाचं. आई सारवायची ते. नळ सार्वजनिक. पाचवीत नंदुरबारला गेलो. सरकारी कॉलनी. तीन खोल्यांचं घर. शेजारी यशवंत आणि कमल स्वर्गे हे शिक्षक. उत्तम इंग्रजी त्यांचं. त्या भाषेचा बाज आणि साज त्यांनीच शिकवला. ते श्रॉफ हायस्कूलमध्ये शिकवायचे. तिथेच मी दाखल झालो. डोंगराच्या खड्डय़ात शाळा. पीटी शिक्षक व्यायाम म्हणून मला तोच चढ चढाउतरायला लावायचे. आजोबा वारल्यावर आजीला सोबत म्हणून नाशिकच्या वाडय़ात राहायला आलो. एका नामांकित शाळेत प्रवेश घेतला.’’

‘‘बी.कॉम. झाल्यावर वडिलांनी स्पष्टच सांगितलं, ऐपतीप्रमाणे शिकवलंय. मी समजलो. नोकरी आणि त्याच वेळी एल.एल.बी. केलं. नंतर पंधरा रुपये तासावर लॉ कॉलेजला टय़ुटर म्हणून शिकवलं. स्थिरस्थावर होण्यासाठी दातार स्विच गीअरमध्ये काम, त्यानिमित्त हिंदुस्थानभर प्रवास. झाडू मारण्यापासून चेकवर सह्या करण्यापर्यंत तिथे केलेली कामं. संतापाच्या भरात एका क्षणात सोडलेली नोकरी, मग मित्राच्या पोल्ट्री बिझनेसमध्ये पार्टनरशिप. कोंबडय़ा वाढवण्यापासून कापण्यापर्यंत केलेली कामं. यातून घरात झालेला हाहाकार.’’ अभय हे सांगत होता तेव्हा वाटलं, एकाच माणसाच्या आयुष्यात किती वळणं यावीत याचं टोकाचं उदाहरण म्हणजे अभय सदावर्ते. मग इंडस्ट्रीसाठी वकिलीची कामं केली. भाडय़ाचं घर घेतलं. मित्रांनी सुचवलेल्या स्थळाशी लग्न केलं.’’ मराठी भाषाप्रेमातून त्यानं ‘इंडिया 20-20’चं भाषांतर केलं खरं, पण मग तेवढय़ावरच गप्प बसला तर तो अभय सदावर्ते कसला? ते प्रकाशित करण्यासाठी परवानगी घ्यायला पेंग्विन प्रकाशनाशी पत्रव्यवहार, 6 ते 7 पत्रे लिहूनही प्रतिसादच नाही म्हटल्यावर कलामसाहेबांना भेटण्याचा पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेला अयशस्वी प्रयत्न, त्यांचा फोन नंबर मिळविण्याचा आटापिटा. त्यात अनेकदा आलेलं अपयश आणि अखेरीस अण्णा युनिव्हर्सिटीत झालेली भेट. पेंग्विन प्रकाशन अभयच्या पत्रांना प्रतिसादच देत नाही हे कळल्यावर कलामसाहेबांनी तत्काळ फोन लावून त्यांना सांगितलं, ‘‘तुम्हाला नकार द्यायचाय की होकार ते तुम्ही ठरवा, पण पत्राला किमान उत्तर तरी द्या.’’ नाहीतर कोण कुठला अभय सदावर्ते, त्याच्यासाठी कलाम साहेबांना स्वतः फोन करायची गरज काय होती? पण अभयच्या मेहनतीला त्यांनी दिलेली ती दाद होती.

मराठी अनुवादाचे या पुस्तकाचे हक्क राजहंस प्रकाशनाकडे असल्याचं पत्र पेंग्विननं पाठवलं आणि अभयची वारी निघाली राजहंस प्रकाशनाकडे. आजवर एकही पुस्तक प्रकाशित नाही, अभय हा भाषेचा नाही, तर कॉमर्सचा विद्यार्थी. माजगावकरांच्या अनुभवी दृष्टीला अभयच्या लिखाणाबद्दल साशंकता असणं स्वाभाविकच होतं, पण ‘‘वाचून तर बघा, पटलं तर प्रकाशित करा’’ असं सांगून मराठी अनुवादाची प्रत तिथे ठेवून अभय परतला. अभयनं केलेला अनुवाद उत्कृष्ट असल्याचं राजहंसनं त्याला कळवलं आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पंधरा दिवसांतच त्याची पहिली आणि अल्पावधीतच पुढच्या तीन आवृत्त्या संपल्यासुद्धा. कलामसाहेब राष्ट्रपती झाले. शपथविधीसाठी अभयला आमंत्रण मिळालं, पण तो म्हणाला, ‘‘पुस्तक प्रकाशित झालं की, त्यांना प्रत देण्यासाठीच मी येईन. कारण तेव्हा मी दिलेला शब्द पूर्ण होईल.’’ प्रत घेऊन अभय मित्रांसह राष्ट्रपती भवनात गेला तेव्हा त्याचं शाही स्वागत झालं. खूप काळजी घेतली गेली.

‘‘तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका. कारण दुसरा यशस्वी प्रयत्न साधला नाही, तर पहिलं यश केवळ नशिबामुळे मिळालं असं लोक म्हणतात’’ हे जाणवल्यासारखा अभयनं अनुवादाचा दुसरा यशस्वी प्रयत्न साधला. पुस्तक होतं ‘बखर इस्रोच्या अग्निबाणाची’. झालं होतं असं की, मोहन आपटे राजहंसमध्ये भेटले तेव्हा अभयला म्हणाले, ‘‘यशाचा गर्व झालेला दिसतोय तुला…’’ आणि मग ‘रिच टू द स्टार्स’चा अनुवाद करायचं नवं आव्हान त्यांनी त्याच्यापुढे ठेवलं. चार वर्षे मेहनत घेऊन आनंद हर्डीकरांच्या संस्करणातून तेही पुस्तक साकारलं.

22/11चा हल्ला डिझाइन करणाऱया हेडलीचा कबुलीजबाब सांगणारं ‘हेडली आणि मी’ हे त्याचं पुढचं अनुवादित पुस्तकही खूप गाजलं. ‘महाभारताचा सचित्र रसास्वाद’ हे अनुवादित पुस्तक भटकळ सरांच्या आग्रहाचं फलित, जे दणक्यात चाललं. ‘राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात’ हेही पुस्तक तसंच लोकप्रिय.जसं देश म्हणजे दगड किंवा माती नसते तसंच घर म्हणजेही भिंती आणि छप्पर नाही, तर माणसंच असतात, असं सांगणाऱया अभयचं घर आणि तोही मित्रांच्या प्रेमावरच उभा आहे हे तो मार्दवानं सांगतो. ‘‘आयुष्यात अपमानाचे प्रसंग अनेक आले, पण त्यातूनही दुसऱयाशी कसं वागू नये हेच शिकलो आणि तेच लक्षात ठेवलं. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा, माणसांचा राग उरला नाही’’ असंही तो म्हणाला. अभयशी बोलताना नव्यानं जाणवलं… आपल्या सर्वांकडे एकसमान प्रतिभा नसते, पण प्रतिभेचा विकास करण्याची संधी सर्वांना समान असते. स्वतःवर विश्वास असला आणि प्रयत्नाची कास धरली तर मग ब्रह्मांडही साथ द्यायला प्रवृत्त होते.