ख्रिसमस आणि केक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीना आंबेरकर

मऊसूत लुसलुशीत

ख्रिसमस म्हणजे धम्माल… भरपूर केक्स… घरी केलेल्या मऊसुत, लुसलुशीत केक्सची मजा काही औरच…

ख्रिसमस जवळ आलेला आहे. बाजारात ख्रिसमसचा माहौल तयार झालेला आहे. वेगवेगळय़ा प्रकारचे केक्स दुकानात दिसू लागले आहेत. काही गृहिणींना घरच्या घरी केक बनवण्याची इच्छा झाली आहे. तर अशा या माहौलमध्ये घरी केक बनवण्यासाठी गृहिणी सज्ज झाल्या आहेत. तर आज काही केकच्या रेसिपीज मी सांगणार आहे. सर्वप्रथम केक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या कोणत्या ते आपण पाहू या.

केककरिता लागणारे सर्व साहित्य प्रमाणात मोजून घ्यावे. ओव्हन व्यवस्थित चालू आहे किंवा नाही तो पाहावा. केक फेटायला सुरुवात करण्यापूर्वी ओव्हन सुरू करावा. केक ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हन चांगला तापायला हवा. केककरिता मैदा शक्यतो ताजा व उत्तम प्रतीचा वापरावा. केककरिता वापरण्याचे लोणी, अंडी, दूध इ. पदार्थ फ्रीजमधून कमीत कमी अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवून मगच वापरावे. केककरिता अंडी ताजीच वापरावी. प्रत्येक अंडे वेगळे फोडून मग एकत्र करावे. केक फेटण्यापूर्वी ज्या भांडय़ात केक करायचा ते भांडे केककरिता तयार करून घ्यावे.

केककरिता भांडे असे तयार करावे

भांडय़ाला सर्व बाजूने तूप लावून घ्यावे. त्यावर 1 चमचा मैदा घालून तो हलवून मैदा सारखा पसरावा. पॅन उलटे करून जास्तीचा मैदा काढून टाकावा. पॅनच्या आकाराचा बटरपेपर किंवा ब्राऊन पेपर कापून घेऊन त्याला तूप लावून पॅनवर व्यवस्थित घालावा.

बेसिक केक करण्याची कृती

साहित्य – 3 अंडी, दीड वाटी मैदा. 1 सपाट वाटी लोणी, 1 चमचा व्हॅनिला, 1 सपाट चमचा बेकिंग पावडर, दीड वाटी पिठी साखर.

कृती – केककरिता मध्यम आकाराचे भांडे तयार करावे. मैदा व पिठीसाखर वेगवेगळे चाळून घेणे. ओव्हन गरम करायला ठेवावा. अंडी भांडय़ात फोडून मग बीटरने किंवा काटय़ाने फेटावीत. लोणी खूप हलके होईपर्यंत फेटावे. थोडी थोडी पिठी साखर घालून फेटावे. फेसलेल्या लोणी-साखरेत थोडा मैदा व थोडे फेटलेले अंडे असे घालत फेटावे. सर्व मैदा व अंडे घालून झाले की 1 चमचा व्हॅनिला व पाव वाटी पाणी घालून फेसावे. अर्ध्या लिंबाचा रस काढून त्यात बेकिंग पावडर व 1 चमचा पाणी घालून केकच्या मिश्रणात घालावे. थोडे फेसून केकच्या भांडय़ात घालून भांडे ओव्हनमध्ये ठेवावे. हा केक मंद आचेवर 150 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर भाजावा. लोणी घालून केलेले केक ओव्हनमध्ये मंद आचेवर भाजावेत. साधारण अर्ध्या तासाने केक फुगून रंग बदलेल. रंग साधारण गुलाबी झाला की विणायची सुई आत घालून कोरडी बाहेर आली की केक झाला. नंतर केक ओव्हनमधून लगेच बाहेर काढावा.

cack-2

ख्रिसमस केक

साहित्य – 150 ग्रॅम मैदा, 175 ग्रॅम साखर, 20 ते 25 काळय़ा मनुका, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, 4 अंडी, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा कॉफी, 1 चमचा आईस्क्रीम इसेन्स, 7 ते 8 चेरी, 25 ग्रॅम ऑरेंज पील्स, 150 ग्रॅम मार्गारीन, 4 ते 5 मोठे चमचे दूध, 2 चमचे कोको, सुका मेवा 30 ग्रॅम.

कृती – मैदा, कोको पावडर एकत्र करून 3 वेळा चाळून घ्या. त्यात कॉफी, सुका मेवा, चेरी, ऑरेंज पील्स, मनुका हे सर्व बारीक चिरून एकत्र करा. नेहमीप्रमाणे मार्गारीन फेसून त्यात साखर घाला. नंतर अंडय़ाचा पांढरा बलक फेसून टाका. नंतर पिवळा बलक व इसेन्स टाकून एकाच बाजूने फेसून घ्या. त्यात मैद्याचे एकत्र केलेले मिश्रण टाकून फेसून घ्या. त्यात दूध टाकून मिश्रण हलके करून घ्या. मोठय़ा पॅनमध्ये मिश्रण टाकून 35 ते 40 मिनिटे बेक करा. नेहमीप्रमाणे केक कापून डब्यात भरा.

cack-2

ब्लॅक फॉरेस्ट केक

साहित्य – दीड वाटी मैदा, सवा वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी रिफाइण्ड तेल, एक अंडे, एक सपाट चमचा बेकिंग पावडर, एक चमचा कोको पाव चमचा मीठ, काजू अथवा बदामांचे काप, व्हॅनिला इसेन्स.

कृती – मैदा, साखर व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. एका पातेल्यात तेल व दही घालून अंडे फोडून घालावे. त्यात मैदा-साखरेचे मिश्रण थोडे थोडे टाकत एकसारखे ढवळत राहावे. दूध गरम करून त्यात घालावे. काजू-बदाम घालावेत. सर्व मिश्रण एकजीव हलवून केकच्या भांडय़ात घालून ते गरम झालेल्या ओव्हनमध्ये ठेवून केक भाजून घ्यावा.

m-cack-2

मावा केक

साहित्य – 1 वाटी मैदा, 1 वाटी लोणी, 1 वाटी पिठी साखर, 3 अंडी, अर्धा चहाचा चमचा वेलची पावडर, 100 ग्रॅम खवा.

कृती – लोणीत थोडी थोडी साखर घालून फेटावे. मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावे. त्यावर हाताने दाबून चाळणीवर खवा चाळून घ्यावा. अंडी फेसून घ्यावीत. फेसलेल्या लोणी-साखरेच्या मिश्रणात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण व थोडे थोडे अंडय़ाचे मिश्रण घालून फेसावे. मिश्रण घट्ट वाटल्यास 1 चमचा दूध घालावे. वेलची पावडर घालावी. मध्यम आकाराच्या केकच्या भांडय़ात अथवा पेपर कपमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून छोटे छोटे कपकेक भाजावेत.