
सामना प्रतिनिधी । मालवण
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमुळे चिवला बिचचे नाव देशपातळीवर पोहचले आहे. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस चिवला बिचवर वाढत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने कोट्यावधी रूपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. यावर्षी स्पर्धे दरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे चिवला बिचबद्दल चुकीच्या पद्धतीने समाजात चर्चा झाली. मात्र जलतरण स्पर्धेतील त्रुटी सुधारत पुढील वर्षी स्थानिक रहिवाशी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक हे एकत्रित येत स्पर्धा आयोजकांसोबत स्पर्धेचे नियोजन करतील. तसेच वर्षानुवर्षे ही स्पर्धा याचठिकाणी होण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्पर्धाही येथे होण्यासाठी चिवलाबिच रहिवाशी आयोजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील. अशी माहिती चिवला बीच येथील व्यावसायिक व रहिवाशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
चिवला बिच येथील हॉटेल सिव्हर सॅण्ड याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेस डॉ. राहूल पंतवालावलकर, उदोजक बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत, उद्योजक भाई कासवकर, संतोष परब, रुजाय फर्नांडिस, किशोर वेंगुर्लेकर, संतोष परब, फ्रांसीस फर्नाडिस, अमित हर्डीकर, चंद्रकांत मयेकर, पाऊलु सोज, मनोज मेथर, शरद जोशी, सोनू फर्नाडिस, रोहित मेथर तसेच इतर उपस्थित होते.
दोघा स्पर्धकांचा झालेला मृत्यू हा अपघाती असून दुदैवी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुख:त आम्ही चिवला बिच वासीय सहभागी आहोत. मात्र या स्पर्धेत १३०० स्पर्धकांसोबत अंध, अपंग, मतिमंद याही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यांनीही स्पर्धा यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली आहे. ७० ते ८० वर्षाचे स्पर्धक सहभागी झाले त्यांनीही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. १०० पेक्षा अधिक जणांची आयोजन टीम समुद्रात व किनाऱ्यावर स्पर्धकांवर लक्ष ठेवून होती. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सागरी जलतरण स्पर्धा आता ऑलम्पीकमध्ये घेतली जाणार असल्याने मालवणातून यशस्वी झालेले स्पर्धक भविष्यात भारतासाठी ऑलम्पीकमध्ये यशस्वी कामगिरी करू शकणार आहेत. आठ वर्षे स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले. १० हजार स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. असे असताना यावर्षी स्पर्धेतील दुर्घटनेमुळे संपूर्ण स्पर्धा आयोजनावर टिका करून स्पर्धा बंद करण्याची भाषा करणे चुकीचे आहे. आम्ही स्थानिक स्पर्धा आयोजकांसोबत असून भविष्यातील स्पर्धेच्या नियोजनात सहभागी होवून यावेळी झालेल्या चुकांची दुरूस्ती केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
स्पर्धक ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी, स्पर्धकांचा विमा, इतर स्पर्धात सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी करून घेणे तसेच इतर काही गोष्टींची चर्चा होत आहे. या गोष्टींवर एकत्रित बसून चर्चा केली जाईल. आयोजकांना नेहमी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य केलेले आहे. तसेच आयोजकांकडूनही राजकीय पक्षांना सोबत घेऊन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. यात शिवसेना, भाजप, स्वाभिमान, राष्ट्रवादी तसेच इतरही मान्यवरांचे सहकार्य मिळालेले आहे. असे असताना कोणी आकसाने आयोजनावर टिका करू नये, असेही यावेळी सांगण्यात आले.


























































