मोदींना पुन्हा बहुमत मिळणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

मंत्रिमंडळाच्या बळावर देश चालवण्याऐवजी गुजरातच्या धर्तीवर नोकरशहांच्या भरवशावर सरकार चालवण्याची चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे असे सांगतानाच मोदींना पुन्हा बहुमत मिळणार नाही, असे ठाम मत ब्रिटनमधील राजकीय नेते आणि अर्थतज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केले आहे. ते मोदी यांचे प्रशंसक म्हणून ओळखले जातात, पण त्यांनीही मोदी सरकारविषयी देशभरात पसरलेली नाराजी अधोरेखित केली आहे.

मोदी हे चांगले नेते आहेत, पण ‘टीम लीडर’ नाहीत. टीमला सोबत घेऊन पुढे जाणारे नेते नाहीत, अशा शब्दांत देसाई यांनी मोदी यांच्यातील उणिवांवरही बोट ठेवले आहे. टीमला सोबत घेऊन न जाण्याची कार्यपद्धती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.
मोदी यांच्याकडे अनेक संधी होत्या. त्याचा त्यांनी उपयोग केला नाही, असे सांगून देसाई म्हणाले की, पंतप्रधानांनी प्रमाणाबाहेर आश्वासने दिली. ती पूर्ण करता आलेली नाहीत. ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत, अशी लोकांची भावना असल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हे दोघे सोडले तर मोदी सरकारमध्ये अनुभवी मंत्रीही नाहीत, असे त्यांनी नमूद केले. मोदी सरकारच्या तुलनेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार सरस होते, असे सांगून देसाई म्हणाले की, काँग्रेसच्या त्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, शरद पवार, पी. चिदम्बरम यांच्यासारखे किमान सहा अनुभवी नेते होते. विशेष म्हणजे ते सर्व जण पंतप्रधानपदाच्या योग्यतेचे होते.