
सामना ऑलाईन । मुंबई
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाणाऱ्या मिनी ट्रेन माथेरानच्या राणीच्या एका डब्याची दोन चाके गुरुवारी दुपारी रुळांवरून घसरल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा इंजिनपासून दुसऱ्या डब्याची दोन चाके घसरल्याने या सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माथेरानच्या राणीचे 8 डिसेंबरपासून नव्या डब्यांद्वारे संचलन सुरू झाले. परंतु उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपशकुन होऊन रविवारी 9 डिसेंबरलाच ही ट्रेन घसरली. त्यानंतर काल 20 डिसेंबर रोजी पुन्हा जुम्मा पट्टी ते वॉटर पाइपलाइन स्थानकांदरम्यान या गाडीच्या लगेजच्या डब्यांची दोन चाके रुळांवरून घसरली. दहा दिवसांतच दोन अपघात झाल्याने या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच शुक्रवारी सकाळी 10.30 वा. पुन्हा या गाडीच्या नेरळ ते माथेरान जाणाऱ्या गाडीच्या इंजिनाच्या नंतरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डब्यांची दोन चाके जुम्मा पट्टी ते वॉटर पाइपलाइन स्थानकांदरम्यानच रुळांवरून घसरली.






























































