
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वतःच्या आयुष्याविषयी बेफिकर असलेल्या चार मित्रांची ‘आम्ही बेफिकर’ ही गोष्ट आता प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं नुकतंच सोशल मीडियाद्वारे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले. 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून पोस्टरवरून हा चित्रपट युथफुल आणि धमाल असल्याचा अंदाज बांधता येतो.
हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कव़िश्वर मराठे यांचे असून चित्रपटाचे संगीत प्रणय अढांगळे यांचे आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्कप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्यासह राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



























































