
>> डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा
एकविसावे शतक उजाडले. स्त्री ही निर्भय बनली. तिला स्वत्वाची जाणीव झाली. शिक्षण मिळाल्यामुळे ती आर्थिकदृष्टय़ा परावलंबी उरली नाही. आत्मविश्वास बळावला आणि आपल्यावर ज्या अनेक वर्षांपूर्वी लैंगिक बळजबरी झाल्या आहेत, त्याला संघटितपणे वाचा फोडण्याकरिता ‘मी टू’ या चळवळीचा उगम झाला. सुगम अर्थ, मीसुद्धा- माझ्यावर यौनशोषणाची नामुष्की ओढवली होती. पण ती आता मी जगासमोर मांडणारच. अशा आवेशात जगभरातून लाखो स्त्रियांनी आपली कैफियत मांडली. त्याकरिता अफाट धैर्य लागते हे तर उघड आहे. त्याचबरोबर अवहेलना, नामुष्की सोसण्याचीही तयारी असायला हवी. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेला पुरावे कुठून मिळणार? ते परिस्थितीजन्यच असणार. त्यामुळे त्यातील सत्य कसे पडताळून पाहता येणार?
हंसा वाडकर या नटीने ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यात या गोष्टी खुल्लमखुल्ला होत्या. त्यामुळे खूप खळबळ माजली होती. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर तत्सम आरोप केले आहेत व त्याची कोर्टात सुनावणी होईलच. एम. जे. अकबर या खासदारावर तर 15 महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केल्याने त्याला राजीनामा देणे भाग पडले. दुसऱया महायुद्धात जपानने कोरियाचा कब्जा मिळवला आणि अनेक सुस्वरूप कोरियन स्त्रियांना भोगदासी (Sex Slaves) म्हणून वर्षानुवर्षे बिनदिक्कत वापरले होते. त्याविषयी आतापर्यंत क्षमेचा एकही शब्द जपानी राज्यकर्त्यांनी उच्चारला नाही. मग त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे तर दूरच राहिले! सिओ जिह्युन ही दक्षिण कोरियामध्ये प्रॉसिक्युटर म्हणून काम करते. अवघी 33 वर्षीय देखणी स्त्री आहे. तिच्यावर आठ वर्षांपूर्वी बलात्कार झाला. ही गोष्ट 2010 सालची. तिच्याच एका वकील सहकाऱ्याने संधी साधून, एका प्रेतयात्रेच्या वेळी दोघे एकत्र होते, तेव्हा तिचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने रेस्टॉरंटमध्ये नेले. पेयात अंमली पदार्थ मिसळून बेशुद्ध केले व जवळच्या हॉटेलमध्ये नेऊन पाशवी बलात्कार केला होता.
ही घटना इतकी अनपेक्षित होती की शुद्धीवर आल्यावर, आपण विवस्त्रावस्थेत आहोत याची जाणीव झाल्यावर सिओ कित्येक वर्षे त्या घटनेला आपणच जबाबदार असल्याचे मानत होती. काही दिवस लोटल्यावर तिने वरिष्ठांकडे तक्रार केली. पण तोपर्यंत सीनियर वकिलाने स्वतःची खोटी बाजू बळकट करून ठेवली होती. सिओच माझ्यावर भाळली आहे व मी नकार दिल्याने ती खोट्यानाट्या कंड्या पिकवत आहे असे त्या बेशरम कामातुराचे म्हणणे होते. सिओवर चारित्र्यहननाचा आरोप केला गेला. मग तिने देशाच्या न्याय खात्याचा दरवाजा ठोठावला. तिथे चौकशीत ‘मी व ती दारू पिऊन धुंद झालो होतो. त्यामुळे नक्की काय घडले व परस्पर संमती होती की नाही हे सांगणे कठीण आहे’ असा बचाव त्या आरोपीने केला. 2017 मध्ये अमेरिका, कॅनडा व इतर पाश्चात्य प्रगत देश यांच्यात ‘मी टू’ चळवळ जोमात वर आली. त्याकडे सिओचे लक्ष होते. ट्रम्पचा सर्वोच्च न्यायालयासाठीचा उमेदवार ब्रेट कॅव्हॅनॉव्ह याच्यावर त्याच्या शालेय मैत्रिणीनेही आरोप केले होते. सिओने रिंगणात उडी घेण्यास हीच योग्य वेळ आहे हे जाणले.
प्रथम तिने स्थानिक, मग राज्य पातळीवर न्याय मागितला. तिला दुर्लक्षित करण्यात आले. मग 29 जानेवारी 2018 रोजी तिने पुढाकार घेऊन दक्षिण कोरियातील अत्यंत लोकप्रिय टीव्ही चॅनेलवर आपली जाहीर कैफियत मांडण्याचे ठरवले. ती मुलाखत ज्वालाग्राही ठरली. तिने सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. कुठेही अडखळली नाही. कोरियात लैंगिक अत्याचार हा जबरदस्त प्रश्न आहे. पण त्याला कोणी वाचा फोडली नव्हती. नंतर एका सर्वेक्षणात जाहीर झाले की, 80 टक्के पुरुषांनी आयुष्यात एकवेळ तरी स्त्र्ायांवर जबरदस्ती केली आहे! जगात स्त्र्ायांचे निर्घृणपणे खून होतात त्यात दक्षिण कोरिया तिसऱया नंबरवर आहे. हे खून बलात्काराचा पुरावाचा समूळ नष्ट करण्यासाठी केले जातात. ‘मी टू’ चळवळ सिओच्या पुढाकाराने कोरियात अस्तित्वात आली. नंतर चीनमध्येही पसरली. जपानमध्ये “with you” असे नाव देऊन संस्थेच्या पुढे महिलांनी आपली बाजू मांडली. थायलंडमध्ये त्या चळवळीचे नाव होते- “Don’t tell me, how to dress!” फिलिपिन्समध्ये अध्यक्ष डय़ुराटेवरही आरोप झाले. तेथे I am woman या नावाने संघटना उदयास आली.
चीनमध्ये मात्र व्यक्तिस्वातंत्र्यालाच मूठमाती दिली गेल्याने स्त्रीहक्क वगैरे फार दूरच्याच गोष्टी झाल्या. पण स्त्रीने आवाज उठवला की तिलाच दोष देण्याची पद्धत आहे! बेजिंग युनिव्हर्सिटीमधील ल्यु चिन या विद्यार्थिनीला मात्र न्याय मिळाला. तुझे मार्कस् वाढवून देतो असे इतिहासाच्या प्राध्यापकाने अभिलाषा दाखवून तिच्यावर जबरदस्तीचा प्रयोग केला. पण ती बधली नाही. तिने आपल्या दोन मैत्रिणींना जवळच्या खोलीत दडवून ठेवले होते. अनेक फोटोज् पुरावे म्हणून काढले. परिणामी त्या प्राध्यापकाला आपली नोकरी गमवावी लागली. पण अशी केस विरळाच. पण ल्युवरील अन्यायाची टीव्हीवरून माहिती मिळताच आणखी काही मुलींना प्रेरणा मिळाली व त्यांनी 12 प्राध्यापकांवर तत्सम आरोप केले.
पण हे सर्व चीनला बदनाम करण्याचे पाश्चात्यांचे प्रयत्न आहेत असे चीनचे राज्यकर्ते दिमाखात सांगत होते. आमची समाजव्यवस्था चोख आहे. स्त्रियांना सन्मानाने वागवले जाते, त्यांना सर्व हक्क मिळतात वगैरे त्यांचे म्हणणे प्रचारकी थाटाचे व हास्यास्पद होते. झियांझी नावाची 25 वर्षीय देखणी टीव्ही निवेदिका, तिच्या मेकअप रूममध्ये घुसून तिच्या कार्यक्रमाच्या निर्मात्यानेच बळजबरी केली. खूप संतापाने झियांझीने इंटरनेटचा आधार घेतला. तिची स्टोरी दोन तासांत उडवली गेली. त्यानंतर तिच्या वैयक्तिक अकाउंटवर पण बंधने घालण्यात आली. पंधरवडय़ानंतर ती बंदी उठवली तरी त्यातून दिला गेलेला संदेश स्पष्ट होता. झियांझी ही प्रख्यात असल्याने तिची कहाणी उघडकीला तरी आली. पण शेतावर, कारखान्यात मजुरी करणाऱया चिनी स्त्रियांना रोज किती अग्निदिव्यांतून जावे लागत असेल?
वास्तविक हे प्रकरण तिथेच मिटू शकले असते. पण झियांझीने ज्याच्यावर आरोप केले होते त्या निष्पाप माणसाला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची खुमखुमी आली. त्याने झियांझीला माफीपत्र आणि 15 हजार डॉलर्स अब्रुनुकसानीखातर देण्याची वकिलाकरवी नोटीस धाडली. आता मात्र झियांझीने शेवटपर्यंत लढा द्यायचाच असा निश्चय केला व तिच्या वकिलाने आरोपीला खरमरीत उत्तर धाडले. हे 25 सप्टेंबर 2018 ला घडले. कोर्टात हा खटला निश्चित उभा राहील. चीनमध्य ‘मी टू’ या चळवळीची ही नुसती सुरुवातच मानायला पाहिजे. हे सर्व सिओ या दक्षिण कोरियन प्रॉसिक्युटरने दाखवलेल्या ठामपणामुळे शक्य झाले. ती सध्या आरोग्य समस्यांमुळे घरी आहे. तिच्या 10 वर्षांच्या मुलासमवेत. सिओसारखीच सापत्न वर्तणूक लीयुन हिच्याही वाटय़ाला आली. तिने सॅमसुंग कंपनीविरोधी दावा ठोकला. पुरावे दिले. ई मेल्स सादर केल्या. पण तिच्यावरच मीडियाने ताशेरे ओढले.
चीनइतकी दडपशाही कोरियात नाही. सुदैवाने सध्याचा अध्यक्ष मून हा स्त्रियांच्या बाजूचा आहे. चीन व जपानमध्येही स्त्र्ायांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाते. सिओ ही दक्षिण कोरियातली प्रसिद्ध प्रॉसिक्युटर, तिलाच सुरक्षितता नसेल तर इतर जणींचे काय? ती म्हणते, ‘मी पुढे आले तेव्हा अनेक रात्री रडून काढल्या. माझ्यासारखाच इतर लाखोंवर अत्याचार होत असतो. पण त्याला वाचा कोण फोडणार? मी निमित्तमात्र व्हायलाच हवे. मी Survivar आहे व सुखी, आनंदी होऊ शकते हेच देशाला दाखवून द्यायचे आहे.’ तिचे विचार स्तुत्य नाहीत असे कोण म्हणेल?
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)



























































