
मधुकर ठाकूर। उरण
घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणारी मीनी ट्रेन रविवारी रुळावरून घसरली. सुदैवाने मीनी ट्रेनमधून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक यातून बचावले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. मात्र वारंवार होणाऱ्या मीनी ट्रेनच्या अपघातामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घारापुरी बेटावर दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येतात. गेटवे आँफ इंडिया (मुंबई ) येथून घारापुरी बेटावरील शेतबंदर जेट्टीवर उतरल्यावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी महेश टूर्स अँण्ड ट्रँव्हल्स कंपनी मीनी ट्रेनची सेवा पुरविते. आबाल वृध्द पर्यटकही सहलीचा आनंद लूटण्यासाठी मीनी ट्रेनच्या प्रवासालाच अधिक प्राधान्य देतात. साधारणता दोन किमी अंतरासाठी पर्यटकांकडून 10 रुपये वसूल केले जातात.
खासगी महेश टूर्स अँण्ड ट्रँव्हल्स कंपनीच्या या मीनी ट्रेनला अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात काही विदेशी पर्यटकही जखमी झाले होते. वारंवार मीनी ट्रेनचे होणाऱ्या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मीनी ट्रेनच्या रुळावरच इंजिनचे आँईल सांडलेले असते. त्यामुळे रुळच निसरडे होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. मात्र याकडे दूर्लक्षच केले जाते. मीनी ट्रेनचे आँडीट आणि चालकाच्या अनुभवाबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. तसेच मागील महिन्यात बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितताबाबतीत झालेल्या बैठकीतही मीनी ट्रेनच्या सुरक्षित वाहतूकीचा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता.आता या अपघाताची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





























































