
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या भाजप, संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यातील वाटपाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज केली. भाजप आणि संयुक्त जनता दल हे प्रत्येकी 17 जागा लढवणार असून लोकजनशक्ती पार्टीला सहा जागांसोबतच पासवान यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे, अशी माहिती शहा यांनी दिली.
नितीश कुमार यांनी भाजप-जदयू युतीने 2009च्या लोकसभा निवडणुकीत 40 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या, याची आठवण करून देत त्याचीच पुनरावृत्ती आम्ही घडवू, असा विश्वास व्यक्त केला. तर बिहारमध्ये ‘एनडीए’ला मजबूत करून 2019च्या लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करून दाखवू, असे पासवान यांनी सांगितले.
याआधी भाजप-जदयू यांनी समसमान म्हणजे 20-20 जागा आपापसात वाटून घेत राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीला ‘बेदखल’ करून टाकले होते. त्यामुळे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा भिरकावून देत भाजपची साथ सोडली होती, तर पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने सात जागांच्या मागणीवर ठाम राहत भाजपला धक्का देण्याचे संकेत दिले होते.
‘56 इंच’वाले नितीश कुमारांपुढे नतमस्तक – कुशवाह
कोणता पक्ष किती जागा लढवतो, याच्याशी जनतेला काही देणेघेणे नसते. पण बिहारमध्ये समसमान जागा घेऊन 56 इंच छातीवाले नितीश कुमार यांच्यासमोर नतमस्तक झालेत, असा टोला राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी लगावला. रामविलास पासवान यांनी ‘हवामाना’चा अंदाज घेऊन स्वतःसाठी राज्यसभेची जागा पदरात पाडून घेतली हे बरे झाले. कारण बिहारमध्ये एनडीए या वेळी खातेसुद्धा उघडू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

























































