केंद्रीय पथकाचा दुष्काळ दौऱ्याची निष्पत्ती शून्य, दुष्काळाने होरपळला शेतकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रमाकांत पाटील, अंबाजोगाई

मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या पाहणी पथकाने जिल्ह्यातील काही ठिकाणी दौरा केला. तरी परंतु अद्यापही दुष्काळजन्य परिसथिती त शासनाने कुठलीही ठोस उपाय योजना केली नाही. नुसताच दौरा केला मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दोन वर्षांपासून सर्वत्र जलसंधारणाची कामे करण्यात आली. काही ठिकाणी याचा फायदाही झाला. या वर्षी पाऊस अर्ध्याहून कमी पडल्याने नद्या, नाले, विहिरी, बोअरवेल्स, बंधारे, छोटे-मोठे तलाव आदी कोरडेठाक पडले आहेत. पावसाअभावी यंदा अंबाजोगाई तालुक्यात रब्बीची पेरणी अवघी ३० टक्के झाली. परंतु पाण्याअभावी पिके करपून गेली. खरीप पिकाबरोबरच रब्बी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

त्याचप्रमाणे चारा उपलब्ध नसल्याने दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. चारा, कडबा पेंढी २५-३० रुपयाला झाली आहे. महागडा चारा खरेदी करून जनावरांना जगवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात गुरा ढोराना कसे जगवायचे असा मोठा प्रश्न समोर येत आहे. चारा नाही, पाणी नाही त्यामुळे जनावरे अक्षरशः मातीमोल किमतीवर चक्क वजनावर विक्री होत आहेत.

या पापाचे धनी नाकर्ते सरकारच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एकूण चौदा गावात अठरा अधिग्रहणे करण्यात आली आहेत. कुरणवडी येथे टँकरची मागणी केली असली, तरी परंतु अद्यापही टँकर सुरू केलेले नाहीत. त्याचप्रमाणे मोंढ्यात धान्याची आवक खूप कमी आहे. त्यामुळे गहू, ज्वारीचे दर दीड पटीने वाढले आहेत.